News Flash

‘रिव्हर मार्च’ला मुख्यमंत्री गैरहजर

यंदा ‘रिव्हर मार्च रॅली’चे चौथे वर्ष होते.

‘रिव्हर मार्च रॅली’चे रविवारी  आयोजन करण्यात आले होते. त्यात अमृता फडणवीस सहभागी झाल्या होत्या.    (छाया-दिलीप कागडा)

नामशेष होत असलेल्या नद्यांच्या संवर्धनासाठी दहिसर नदीच्या तीन किमी परिसरातून रविवारी सकाळी ‘रिव्हर मार्च रॅली’ काढण्यात आली. या रॅलीसंदर्भात तयार करण्यात आलेल्या ‘रिव्हर अ‍ॅँथम’मधील सहभागामुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांना विरोधकांच्या टीकेला सामोरे जावे लागल्याने निमंत्रणपत्रिकेवर नावे असूनही ते कार्यक्रमाला अनुपस्थित राहिल्याची चर्चा रंगली होती.

मुंबईच्या पश्चिम उपनगरातील दहिसर, पोयसर, ओशिवरा आणि वालभट या नद्यांची दयनीय अवस्था झाली आहे. गेल्या तीन वर्षांपासून या नद्यांच्या पुनरुज्जीवनासाठी ‘रिव्हर मार्च’ मोहिमेअंतर्गत विविध सामाजिक संस्थांनी एकत्र येत नदी संवर्धनाचे कार्य हाती घेतले आहे. यंदा ‘रिव्हर मार्च रॅली’चे चौथे वर्ष होते. यानिमित्ताने मुंबईतील नद्यांचे महत्त्व सर्वसामान्य नागरिकांपर्यंत पोहोचविण्यासाठी एका विशेष गीताचे चित्रीकरण करण्यात आले होते. या गीताच्या चित्रफितीत मुख्यमंत्र्यांसह अमृता फडणवीस,  सुधीर मुनगंटीवार, पालिका आयुक्त अजोय मेहता आणि  पोलीस आयुक्त दत्ता पडसलगीक र यांनी सहभाग घेतला होता. त्यामुळे  हे गीत विरोधकांच्या चर्चेचा विषय ठरले होते.

रविवारी आयोजित ‘रिव्हर मार्च रॅली’ कार्यक्रमाकडे अनेक संस्था तसेच शिवसेनेच्या स्थानिक नेत्यांनी पाठ फिरवली होती. रॅलीमध्ये अमृता फडणवीस, सामाजिक कार्यकर्ते विक्रम चोगले, विविध सामाजिक संस्थांचे सदस्य, परिसरातील अनेक शाळा आणि महाविद्यालयांचे विद्यार्थी सहभागी झाले होते.

दहिसर नदीवर बंधारा

संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाच्या हद्दीतील दहिसर नदीच्या पात्रात बांधण्यात येणाऱ्या बंधाऱ्याच्या भूमिपूजनचा कार्यक्रमही रविवारी पार पडला. या प्रकल्पाअंतर्गत राष्ट्रीय उद्यानातील बोट फेरी पॉइंट येथे असलेल्या छोटय़ा बंधाऱ्यापासून ७०० मीटर अंतरावर बंधारा बांधण्यात येणार आहे.  या संपूर्ण प्रकल्पासाठी २२ लाख रुपयांचा खर्च अपेक्षित असून आर्ट ऑफ लिव्हिंग संस्था १५ टक्के खर्च उचलणार आहे तर इतर खर्च सामाजिक संस्थांकडून देणगी स्वरूपात मिळविण्यात येणार आहे. बंधाऱ्याच्या बांधकामासाठी वन विभागाने परवानगी दिली असून येत्या दोन दिवसांत पालिकेच्या परवानगीसाठी अर्ज दाखल केला जाणार असल्याची माहिती या प्रकल्पाचे ‘आर्ट ऑफ लिव्हिंग’चे समन्वयक हिमांशू मेहता यांनी दिली.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 5, 2018 4:03 am

Web Title: cm absent on river march in mumbai
Next Stories
1 राज्यात पुन्हा गारपीट?
2 १३ हजार अंगणवाडय़ा पोरक्या?
3 सैनिकांच्या अपमानाचा भाजपला विसर कसा?
Just Now!
X