पूरग्रस्तांच्या मदतीसाठी मुख्यमंत्र्यांची घोषणा
मुंबई / चिपळूण : महापुरामुळे सर्वस्व गमावलेल्या चिपळूण शहरातील व्यापाऱ्यांना धीर देतानाच पूर परिस्थितीचा आढावा घेऊन पूरग्रस्तांसाठी नुकसानभरपाईची सर्वंकष योजना जाहीर केली जाईल, अशी घोषणा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी रविवारी येथे केली. त्याचबरोबर जिल्हा स्तरावर ‘एनडीआरएफ’च्या धर्तीवर आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा स्थापन करण्याचेही त्यांनी जाहीर केले.

गेल्या गुरुवारी आलेल्या महापुरामुळे चिपळूण शहराचे अभूतपूर्व नुकसान झाले आहे. या परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी मुख्यमंत्री ठाकरे रविवारी दुपारी चिपळूणमध्ये आले होते. जिल्ह्याचे पालकमंत्री अनिल परब, उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत, अन्य लोकप्रतिनिधी आणि वरिष्ठ प्रशासकीय अधिकाऱ्यांसमवेत आढावा घेतल्यानंतर मुख्यमंत्र्यांनी पत्रकार परिषद घेतली. ते म्हणाले, ‘‘केवळ सवंग लोकप्रियता मिळवण्यासाठी मी लगेचच काहीतरी घोषणा करणार नाही. राज्यातील पूर परिस्थितीचा सर्वंकष आढावा घेतल्यानंतरच नुकसानभरपाईची योजना जाहीर करण्यात येईल. हे करताना तांत्रिक अडचणी येऊ  नयेत या दृष्टीनेही काही सूचना प्रशासनाला केल्या आहेत.’’ आता तातडीची मदत म्हणून अन्न, औषधे, कपडे आणि इतर आवश्यक वस्तू पूरग्रस्तांना तात्काळ देण्याबाबत संबंधित जिल्हाधिकाऱ्यांना निर्देश दिले आहेत, असेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले.  मी चिपळूणच्या पूरग्रस्त भागाची आज पाहणी केली. नागरिकांशी प्रत्यक्ष भेटून संवाद साधला. शनिवारी मी रायगड जिल्ह्यातल्या तळये गावातील भीषण परिस्थिती पाहिली. तेथे अंगावर काटा येईल अशी दृश्ये आहेत. सोमवारी पूरग्रस्त पश्चिम महाराष्ट्राचाही आढावा घेणार आहे. तो घेतल्यानंतरच नुकसानभरपाईची योजना जाहीर केली जाईल, असे मुख्यमंत्री ठाकरे यांनी स्पष्ट केले.

Relief for flood affected Chirner due to works started before monsoon
पावसाळ्यापूर्वी सुरू झालेल्या कामांमुळे पूरग्रस्त चिरनेरला दिलासा?
Unseasonal weathe hail in Vidarbha Three districts of Marathwada are also affected by rain
विदर्भात अवकाळी, गारपीट; मराठवाडय़ाच्या तीन जिल्ह्यांनाही पावसाचा तडाखा
ring of fire
विश्लेषण : भूकंपप्रवण क्षेत्र म्हणून ओळखले जाणारे ‘रिंग ऑफ फायर’ नेमके कुठे आहे? या भागात सर्वाधिक भूकंप का होतात?
heavy traffic in patri pool area in kalyan
कल्याण : पत्रीपुलामुळे पुन्हा मनस्ताप, आता रस्ते कामामुळे अभूतपूर्व वाहतूक कोंडी

बैठकीपूर्वी मुख्यमंत्री दुपारी एकच्या सुमारास चिपळूणच्या बाजारपेठेत पोहोचले. तेथे त्यांनी दोन वेळा व्यापाऱ्यांच्या व्यथा ऐकल्या. अनेक दुकानदारांनी तातडीच्या आर्थिक साहाय्याची विनंती मुख्यमंत्र्यांना केली. प्रशासनाने पुराची सूचना वेळीच न दिल्यामुळे मोठे नुकसान झाल्याची तक्रार व्यापाऱ्यांनी केली. व्यापाऱ्यांचे गाऱ्हाणे ऐकल्यानंतर मुख्यमंत्र्यांनी, ‘‘तुम्ही काळजी करू नका, तुम्हाला इजा झाली नाही ना? तुम्ही सर्व सुरक्षित आहात ना? तुमच्या नुकसानीबाबत निर्णय घेण्यात येईल, ते काम आता आमचे आहे’’, अशा शब्दांत व्यापाऱ्यांना दिलासा दिला.

केंद्र सरकारकडून महाराष्ट्राली व्यवस्थित मदत मिळत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि केंद्रीय संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांच्याशी माजी चर्चा झाली आहे.  एनडीआरएफ, लष्कर तसेच हवाई दल यांच्या तुकड्या राज्य सरकारला पूरपरिस्थितीत मदत करत आहेत. राज्यातील पूरपरिस्थितीचा संपूर्ण आढावा घेतल्यानंतरच केंद्राकडून आर्थिक मदतीची मागणी करण्यात येईल, असेही मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले.

‘महिलेचा टाहो’

मुख्यमंत्री व्यापाऱ्यांशी चर्चा करीत असतानाच एका महिलेने ओक्साबोक्शी रडत तिची वेदना मांडली. ‘‘पुराचे पाणी माझ्या घराच्या छतापर्यंत पोहोचले. त्यात सर्वकाही वाहून गेले. तुम्ही काहीही करा, पण आम्हाला मदत करा. मदत केल्याशिवाय जाऊ  नका हो’, अशी विनवणी तिने केली. मुख्यमंत्र्यांनीही या महिलेपुढे हात जोडत मदतीची ग्वाही दिली.

दुर्घटनाग्रस्तांच्या मदतीसाठी  पालिके ची पथके  रवाना

मुंबई : कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रातील पूरग्रस्तांच्या मदतीसाठी मुंबई महापालिके ची दोन पथके  रविवारी रायगड आणि कोल्हापूरला रवाना झाली. रायगडला गेलेल्या पथकात दोन वैद्यकीय चमू, एक फिरती प्रयोगशाळा, घनकचरा व्यवस्थापन खात्यातील सुमारे ७५ कर्मचारी, पाण्याचे चार टँकर, एक टोइंग वाहन यांचा समावेश आहे.

जिल्हा पातळीवरही आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा!

अशा दुर्घटना घडू नयेत किंवा महापुराने नुकसान होऊ नये म्हणून पूरव्यवस्थापन करणारी यंत्रणा निर्माण करण्यात येईल. त्याचबरोबर ‘एनडीआरएफ’च्या धर्तीवर जिल्हा पातळीवरही स्वतंत्र आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा उभी करण्यात येईल, असेही मुख्यमंत्र्यांनी नमूद केले.

रायगडमध्ये ५३ बळी; ३१ बेपत्ता

अलिबाग : महाड तालुक्यातील तळये गावात रविवारी आणखी अकरा मृतदेह सापडले. त्यामुळे मृतांचा आकडा ५३ वर पोहोचला आहे. अद्यापही ३१ जण बेपत्ता असून त्यांचा शोध सुरू आहे.

रत्नागिरीत १६ मृत्यू

रत्नागिरी : खेड तालुक्यातील पोसरे बौद्धवाडी येथील दरड दुर्घटनेतील आणखी १३ बेपत्ता ग्रामस्थांचे मृतदेह रविवारी सापडल्याने १६ जणांचा मृत्यू झाल्याचे स्पष्ट झाले.  एक ग्रामस्थ अजूनही बेपत्ता आहे.

राज्यात पावसाचे १५०हून अधिक बळी 

मुंबई : राज्यात अतिवृष्टीमुळे दरड दुर्घटनांमध्ये आणि महापुरात आतापर्यंत १५० पेक्षा अधिक नागरिकांचा मृत्यू झाला असून अद्याप ६४ जण बेपत्ता आहेत. कोकणात दरडी कोसळल्याने आणि पुरात बुडून ८३ नागरिकांचा, तर सातारा जिल्ह्यात ४१ लोकांचा मृत्यू झाला. साताऱ्यात मृतांचा आकडा ४१ : सातारा जिल्ह्यात भूस्खलन, दरड कोसळल्याने आणि पुरात वाहून गेलेल्या मृतांचा आकडा ४१ वर पोहोचला आहे. आणखी पाच जण बेपत्ता असून त्यांचा शोध सुरू आहे.