पर्यावरणाचा ऱ्हास थांबविण्यासाठी राज्यात मोठय़ा प्रमाणावर वृक्ष लागवडची मोहीम हाती घेण्यात येईल, अशी घोषणा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केली. जिथे जागा आणि पाणी आहे, तिथे वृक्ष लागवड झाली पाहिजे, असे त्यांनी सांगितले.

मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव विकास खारगे यांनी लिहिलेल्या ‘एक हरित चळवळ, वृक्ष लागवडीचा महाप्रयोग’ या पुस्तकाचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते प्रकाशन झाले, त्या वेळी ते बोलत होते.

पर्यावरण रक्षणाला शासनाचे सर्वोच्च प्राधान्य असून त्यामुळेच आपण आरेचे ८०० एकरचे जंगल जपण्याचा क्रांतिकारी निर्णय घेतला आहे. वाढत्या जागतिक तापमानाला रोखण्यासाठी आणि प्रदूषण कमी करण्यासाठी ज्या उपाययोजना आहेत त्यात वृक्ष लागवड हा महत्त्वाचा विषय असून तो केवळ आवडीचा नाही तर गरजेचा झाला आहे. पर्यावरणाचा होणारा ऱ्हास थांबवण्यासाठी डोंगरावर जलसंधारणाची कामे हाती घेणे, वृक्ष लागवडीची मोहीम जोमाने पुढे नेण्याची गरज आहे, असेही मुख्यमंत्री म्हणाले.