नवी मुंबई महापालिका आयुक्त तुकाराम मुंढे यांनी अनधिकृत बांधकामाविरोधात चालवलेल्या धडक कारवाईमुळे अनेकांच्या तोंडचे पाणी पळाले. पालिकेच्या या कारवाईला विरोध करत सोमवारी १८ जुलै रोजी प्रकल्पग्रस्त, व्यापारी आणि इतर पक्षाने नवी मुंबई बंदचा इशारा दिला होता. पण हा बंद मागे घेण्यात आला असल्याची माहिती आमदार मंदा म्हात्रे यांनी दिली.

मुख्यमंत्र्यांनी नवी मुंबई येथील अनधिकृत बांधकामावर चालू असलेली कारवाई तुर्तास थांबवण्याचे आदेश दिले आहेत. सदर कारवाईस विरोध असणा-या आमदार मंदा म्हात्रे यांनी ‘वर्षा’ बंगल्यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची आज भेट घेतली. वर्षावर झालेल्या चर्चेनंतर  मुख्यमंत्र्यांनी या बांधकामास स्थगिती देण्याचे आदेश दिले आहेत. त्यानंतर मंदा म्हात्रे यांनी बंद मागे घेत असल्याचे जाहिर केले.

मुख्यमंत्र्यांच्या आदेशामुळे प्रकल्पग्रस्तांना काही काळासाठी दिलासा मिळाला आहे. पावसाळा संपेपर्यंत या कारावाईस स्थगिती देण्यात आली आहे.  गेल्या काही दिवसांपासून मुंढे यांनी बांधकामावर कारवाई करण्याचे आदेश दिले होते. त्यानंतर अनधिकृत बांधकामे, बेकायदेशीरपणे वाढवण्यात आलेल्या शेड्स आणि गावठाणातील अनेक बांधकामांवर कारवाई करण्यात आली होती. या धडक कारवाईमुळे नवी मुंबईतील प्रकल्पग्रस्त संतप्त झाले होते.