महाराष्ट्रातील जातीय शक्तींचा पराभव करण्यासाठी आगामी २०१४ सालच्या विधानसभा निवडणुका कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्ष एकत्रितरित्या लढवतील अशी घोषणा मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी रविवारी केली.
राष्ट्रवादीच्या वाढत्या राजकीय मागण्यांबाबत चव्हाण म्हणाले की, जर एखाद्या राजकीय पक्षाला आपला राजकीय आवाका आणि सांखिक बळ वाढवायचे असेल तर त्यात काहीच गैर नाही. ते नैसर्गिकच आहे.
सत्तेत टिकून रहायचे असेल तर आघाडी शिवाय पर्याय नाही, असे कॉंग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांनी जयपूर येथे झालेल्या चिंतन शिबिरात म्हटले होते. त्या पार्श्वभूमीवर चव्हाण यांच्या या वक्तव्याला अधिक महत्व आहे.   
राष्ट्रवादीच्या वाढत्या मागण्यांचा विचार करता महाराष्ट्र प्रदेश कॉंग्रेस कमिटी आगामी निव़डणुका स्वबळावर लढवण्याचा पर्यायही पडताळून पाहण्याच्या विचारात आहे, त्यामुळे ते चव्हाणांच्या या मताशी सहमत असतीलच असे नाही.
राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार हेसुध्दा आगामी निवडणुकांसाठी कॉंग्रेससोबत आघाडी करण्यास तयार असल्याचे दिसते. ‘जातीय शक्तींना दूर ठेवण्यासाठी मी नेहमीच धर्मनिरपेक्ष आघाडीला आपला पाठिंबा दर्शविला आहे.’, असं पवार एका नागपूरमध्ये एका कार्यक्रमात बोलताना म्हणाले.
दरम्यान कॉंग्रेसच्या राष्ट्रीय नेतृत्वाने याघडीला पवारांना कोणत्याही गोष्टीत सहभागी करून घेऊ नये असे आदेश दिले आहेत. मात्र, पवार आणि चव्हाण यांच्या वक्तव्याने कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी यांच्यामधील आघाडीचा पुर्नविचार होण्याची शक्तता वर्तवण्यात येत आहे.
काही आठवड्यांपूर्वी महाराष्ट्र प्रदेश कॉंग्रेस कमिटीचे अध्यक्ष माणिकराव ठाकरे म्हणाले होते की, महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यातील कॉंग्रेस नेत्यांशी चर्चा केल्यानंतरच याबाबतीतला निर्णय घेतला जाईल. त्याचवेळेस उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी, राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्ष विधानसभेच्या सर्वच्या सर्व २८८ जागा स्वबळावर लढवण्याची तयारी करत असल्याचे वक्तव्य कोल्हापूरात केले होते.