23 October 2019

News Flash

आम्ही बिना आंघोळीचं विधानसभेत येणार नाही, मुख्यमंत्र्यांचं अजित पवारांना प्रत्युत्तर

बिना आंघोळीचं मुख्यमंत्र्यांना विधानभवनात येऊ दे. त्याशिवाय यांना कळणार नाही अशी टीका अजित पवार यांनी केली होती

आम्हाला रोज आंघोळ करु द्या, आम्ही बिनाआंघोळीचं विधानसभेत येणार नाही असं प्रत्युतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राष्ट्रवादीचे विधिमंडळ पक्षनेते अजित पवार यांना दिलं आहे. मुख्यमंत्र्यांच्या वर्षा बंगल्यासहीत अनेक मंत्र्यांची नावं बीएमसीने पाणीपट्टी भरली नसल्याने डिफॉल्टर यादीत टाकण्यावरुन अजित पवार यांनी मुख्यमंत्र्यांवर टीका केली होती. यांचं पाणी तोडून टाका… बिना आंघोळीचं त्यांना विधानभवनात येऊ दे. त्याशिवाय यांना कळणार नाही अशा शब्दांत त्यांनी मुख्यमंत्र्यांना धारेवर धरलं होतं.

अजित पवारांच्या आरोपांना उत्तर देताना मुख्यमंत्र्यांनी सांगितलं की, ‘बिलं नियमितपणे भरली गेली होती. भरली गेलेली बिलं पुन्हा आल्यामुळे बिलं थांबवण्यात आली. यानंतर महापालिकेला यासंबंधी पत्र पाठवण्यात आलं. यादरम्यानच्या काळात महिना, दीह महिना गेला. महापालिकेनेही चूक मान्य करत सुधारणा केलेली बिलं पाठवली. ती भरली गेली आहेत’. पुढे बोलताना त्यांनी आम्हाला रोज आंघोळ करु द्या, आम्ही बिनाआंघोळीचं विधानसभेत येणार नाही असं म्हणत अजित पवारांना प्रत्युतर दिलं.

मुख्यमंत्र्यांसहीत मंत्र्यांचं पाणी तोडून टाका, बिना आंघोळीचं विधानभवनात येऊ दे – अजित पवार

याआधी अजित पवार यांना यावरुन मुख्यमंत्र्यांवर निशाणा साधत म्हटलं होतं की, ‘मुंबईत करोडो लोक राहतात. त्यांनी जरा कुठे पाणीपट्टी भरली नाही तर त्यांचे कनेक्शन कापले जाते. ताबडतोब त्यांना पैसे भरावे लागतात. त्यांना वाली कुणी नाही. मुख्यमंत्र्यांच्या वर्षा बंगल्यासहीत अनेक मंत्र्यांच्या बंगल्यावरील मीटरचे पैसे भरले जात नाही. राज्यसरकारची दयनीय अवस्था झाली आहे का? पैसे वेळेवर भरले का जात नाही ? मंत्र्यांच्या बंगल्याची पाणीपट्टी थकली का जाते?’.

महापालिका डिफॉल्टर यादीत टाकत असेल तर हा कमीपणा नाही का? अधिकारी झोपा काढतात का?  महाराष्ट्र काय धडा घेईल. जनता म्हणेल हेच पैसे भरत नाही तर आपण तरी कशाला भरावे ? याची नोंद घ्यावी अशी मागणी अजित पवार यांनी केली होती.

 

First Published on June 25, 2019 4:31 pm

Web Title: cm devendra fadanvis varsha bunglow water bill bmc ncp ajit pawar monsoon session sgy 87