वेगळ्या विदर्भाबाबत ज्येष्ठ वकील उज्ज्वल निकम यांच्याकडून एका कार्यक्रमात विचारण्यात आलेल्या प्रश्नाला उत्तर देताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हजरजबाबी वृत्तीचा प्रत्यय आला. काही दिवसांपूर्वी फडणवीस यांचे निकटवर्तीय श्रीहरी अणे यांना वेगळा विदर्भ आणि मराठवाड्याच्या मुद्द्यावरून राज्याच्या महाधिवक्तापदावरून पायउतार व्हावे लागले होते. यानंतर ते सातत्याने वेगळ्या विदर्भाबाबतची भूमिका ठामपणे मांडताना दिसत आहेत. हाच धागा पकडत लोकमत’ समूहाच्या ‘महाराष्ट्रीयन ऑफ द इयर’ या पुरस्कार सोहळ्यात उज्ज्वल निकम यांनी मुख्यमंत्र्यांना पेचात टाकणारा प्रश्न विचारला. श्रीहरी अणेंसारखी तुमच्या जवळची मंडळी वेगळ्या विदर्भाची मागणी करतात, याबाबत तुमचे म्हणणे काय आहे, असे निकम यांनी मुख्यमंत्र्यांना विचारले. या प्रश्नाला उत्तर देताना फडणवीसांनी त्यांचा हजरजबाबी वृत्तीचा नमुना पेश केला. उलटतपासणीच्यावेळी प्रत्येकाला वकील नेमण्याचा अधिकार असतो. मी अणेसाहेबांना माझा वकील म्हणून नेमले आहे. त्यामुळे यासंदर्भात माझे उत्तर काय आहे, हे तुम्ही त्यांनाच विचारा, असे सांगत मुख्यमंत्र्यांनी या प्रश्नाचे थेट उत्तर देणे शिताफीने टाळले.