ज्येष्ठ साहित्यिक आणि पत्रकार अरूण साधू यांच्या निधनाने मराठी साहित्याला वास्तववादाचे वळण देणारा लेखक आपण गमावला आहे, अशा शब्दांत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी श्रद्धांजली वाहिली आहे. मुख्यमंत्री आपल्या संदेशात म्हणतात, आंतरराष्ट्रीय व्यवहार आणि सामाजिक स्थित्यंतराचे अभ्यासू निरीक्षक असलेल्या श्री. साधू यांनी मराठी वाचकाला वास्तववादी दर्शन घडवले. त्यांच्या कादंबऱ्या समकालिन राजकीय- सामाजिक स्थितीचे यथार्थ दर्शन घडवितात. मराठी साहित्याला समृद्ध करतानाच त्यांची पत्रकारितेला एक वेगळा आयाम दिला. त्यासोबतच पत्रकारांच्या नव्या पिढ्या घडविल्या. अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदाचा गौरव प्राप्त झालेल्या श्री. साधू यांचे व्यापक लिखाण पत्रकारिता आणि साहित्य विश्वात येऊ पाहणाऱ्यांसाठी नेहमीच मार्गदर्शक ठरेल. त्यांच्या निधनाने केवळ एक व्यासंगी पत्रकार आणि लेखकासोबतच पत्रकार घडविणारा प्राध्यापक आपण गमावला आहे.

ज्येष्ठ पत्रकार आणि प्रसिद्ध साहित्यिक अरुण साधू यांचे सोमवारी पहाटे मुंबईत निधन झाले. ते ७५ वर्षांचे होते. कालपासून मुंबईतील सायन रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरु होते. तिथेच त्यांनी अखेरचा श्वास घेतला. मराठीसह इंग्रजी पत्रकारितेत अमूल्य योगदान देणार्‍या अरुण साधू यांनी मराठी साहित्यातही अफाट मुशाफिरी केली. कथा, कादंबरी, ललित, चरित्र, वैचारिक लेखन, भाषांतर अशा साहित्याचे विविध प्रकार हाताळत, प्रत्येक प्रांतात त्यांनी आपल्या लेखनाची छाप पाडली. साधू यांच्या निधनाच्या पार्श्वभूमीवर पत्रकारिता, साहित्य व सामाजिक क्षेत्रातील अनेक मान्यवरांनी दु:ख व्यक्त केले आहे.

परखड,व्यासंगी साहित्यिकाला आपण मुकलो- विनोद तावडे

पत्रकारिता आणि साहित्य अशा दोन्ही क्षेत्रात स्वत:चा वेगळा ठसा उमटवणारे आणि जगातील साम्यवादी क्रांतीचा इतिहास अत्यंत सोप्या शब्दांत मराठी वाचकांपर्यंत पोहोचविणारे ज्येष्ठ साहित्यिक,पत्रकार अरुण साधू यांच्या निधनामुळे पत्रकारिता, साहित्य व सामाजिक क्षेत्रातील एकपरखड,व्यासंगी साहित्यिकाला आपण मुकलो आहोत, अशा शब्दात सांस्कृतिक कार्यमंत्री श्री. विनोद तावडे यांनी आपला शोक व्यक्त केला आहे.

‘सिंहासन’, ‘झिपऱ्या’, ‘मुंबई दिनांक’ अशा एकाहून एक सरस कलाकृतींनी मराठी साहित्यविश्वात पत्रकार अरुण साधू यांनी स्वत:चे अढळ स्थान निर्माण केले होते. ज्येष्ठ साहित्यिक, समीक्षक आणि चतुरस्त्र प्रतिभेच्या अरुण साधू यांनी मराठीत कादंबरी, कथासंग्रह,एकांकिका, नाटक आणि ललित लेखन या विविध साहित्यप्रकारांच्या माध्यमातून विपूल लेखन केले. त्यांच्या ‘सिंहासन’ आणि ‘मुंबई दिनांक’ या दोन कादंबऱ्या मराठी साहित्यविश्वात प्रचंड लोकप्रिय ठरल्या. विविधांगी स्वरुपाच्या लिखाणाने साधू यांनी पत्रकारिता आणि साहित्याच्या क्षेत्रात स्वत:चा वेगळा ठसा उमटविला होता. गेली ४० वर्ष सातत्याने समकालाचा वेध घेणारं लेखन अरुण साधू यांनी केले होते, त्यांच्या निधनाने साहित्य, पत्रकारिता क्षेत्राची हानी झाली आहे, असेही श्री.विनोद तावडे यांनी आपल्या शोकसंदेशात नमूद केले आहे.