सिंचन घोटाळ्याच्या चौकशीची टांगती तलवार डोक्यावर असलेले माजी जलसंपदामंत्री व राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्या राजकीय कारकीर्दीस ३० वर्षे पूर्ण झाल्याबद्दल सोमवारी आयोजित करण्यात आलेल्या समारंभाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दांडी मारली. या कार्यक्रमात ते प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार होते. मात्र, त्यामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या होत्या. देवेंद्र फडणवीस हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार असल्याने सिंचन घोटाळ्याच्या चौकशीचे पुढे काय होणार, असा सवाल ज्येष्ठ समाजसेविका अंजली दमानिया यांनी केला होता. त्यामुळे मुख्यमंत्री आज काय भूमिका घेणार याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. अखेर आज मुख्यमंत्र्यांनी या कार्यक्रमाला दांडी मारली. कार्यक्रम पत्रिकेत मुख्यमंत्र्यांचा उल्लेख प्रमुख पाहुणे म्हणून करण्यात आला होता. मात्र, ऐनवेळी त्यांच्याऐवजी महसूल मंत्री चंद्रकांत पाटील आणि गिरीश बापट यांनी या कार्यक्रमाला हजेरी लावली होती. त्यामुळे आता येणाऱ्या काळात भाजप आणि राष्ट्रवादीतील राजकीय संबंधांना यामुळे बाधा पोहोचणार का, हे पाहणे महत्त्वाच ठरेल. तर दुसरीकडे या कार्यक्रमाला नारायण राणे यांचीही उपस्थिती असल्याने त्यांच्यासोबत मंचावर बसण्याचं शिवसेनेच्या संजय राऊतांनीही टाळलं आहे.

दरम्यान, हा कार्यक्रम सुरु होण्याआधी सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी रविंद्र नाट्य मंदिराबाहेर निदर्शनं केली. मात्र, पोलिसांनी त्यांना प्रवेश नाकारत ताब्यात घेतलं. सिंचन घोटाळ्यात अडकलेल्या तटकरेंच्या कार्यक्रमाला सरकारचे प्रतिनिधी कसे उपस्थित राहतात, असा सवाल अंजली दमानिया यांनी केला.