मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे स्पष्टीकरण

नुकत्याच पार पडलेल्या महाराष्ट्र विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात शेतकरी कर्जमाफी आणि मराठा समाजाच्या विकासासाठी विविध उपाययोजना अशा महत्त्वपूर्ण निर्णयांसह दोन्ही सभागृहांत एकूण २० विधेयके मंजूर करण्यात आली असून या कालावधीत अनेक लोकहिताचे निर्णय मार्गी लावण्यात यश आल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.

अधिवेशनात शेतकरी कर्जमाफी, मराठा समाजाच्या विकासासाठी विविध उपाययोजना,  समाजातील वंचित-उपेक्षित घटक आणि महिलांच्या विकासासंदर्भात अनेक निर्णय घेण्यात आले. पंडित दीनदयाळ उपाध्याय, नानाजी देशमुख, ज्येष्ठ नेते शरद पवार, माजी पंतप्रधान इंदिरा गांधी,  गणपतराव देशमुख आणि बाळासाहेब देसाई यांच्या कार्याचर  गौरव करणारे ठरावदेखील या अधिवेशनात घेण्यात आले. त्याचप्रमाणे १९४२ च्या चले जाव चळवळीला ७५ वर्षे पूर्ण झाल्याबाबतही ठराव मांडण्यात आला. धार्मिक, धर्मादाय किंवा इतर प्रयोजनांसाठी वर्गणी, अंशदान गोळा करण्याकरिता साहाय्यक किंवा उपधर्मदाय आयुक्तांच्या परवानगीबाबतचे विधेयक. दहापेक्षा अधिक कर्मचारी असणाऱ्या दुकाने, वाणिज्यिक आस्थापना, निवासी हॉटेले, उपाहारगृहे, खाद्यगृहे, थिएटर २४ तास सुरू ठेवण्यास मान्यता देणारे विधेयक. त्याचप्रमाणे अनधिकृत इमारतींवर बसविण्यात येणाऱ्या शास्तीच्या रकमेत सुधारणा करण्यासाठी अशी शास्ती मालमत्ता कराच्या दुपटीऐवजी महानगरपालिका ठरवील अशी तरतूद करण्यासंदर्भातील विधेयक, नागरी भागातील स्थावर मालमत्तेच्या हस्तांतरणासाठी ५ टक्के आणि ग्रामीण भागात ३ टक्के मुद्रांक शुल्क आकारण्याबाबतच्या विधेयकांसह २० विधेयके संमत करण्यात आली.