News Flash

मुख्यमंत्र्यांचा सभांचा सपाटा!

राज्यातील १६४ नगरपालिका आणि नगर पंचायतींची निवडणूक भाजपने प्रतिष्ठेची केली आहे.

विरोधी वातावरणामुळेच भाजपच्या प्रचाराची धुरा स्वत:च्या खांद्यावर

नगरपालिका निवडणुकांच्या प्रचारात मुख्यमंत्री अपवादानेच सहभागी होतात, असा आजवरचा अनुभव असला तरी पुढील रविवारी होणाऱ्या  नगरपालिका आणि नगर पंचायतींच्या निवडणुकांमध्ये भाजपचे ‘स्टार प्रचारक’ म्हणून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यभर दौरे सुरू केले आहेत. निश्चलनीकरणानंतर निर्माण झालेल्या परिस्थितीच्या पाश्र्वभूमीवर भाजपकरिता वातावरण तेवढे अनुकूल नसल्यानेच मुख्यमंत्र्यांना प्रचाराची धुरा स्वत:च्या खांद्यावर घ्यावी लागली आहे.

राज्यातील १६४ नगरपालिका आणि नगर पंचायतींची निवडणूक भाजपने प्रतिष्ठेची केली आहे. थेट नगराध्यक्षपदाची निवडणूक असल्याने जास्तीत जास्त नगराध्यक्ष निवडून आणण्याचा भाजपचा प्रयत्न आहे. यामुळेच प्रचारात स्वत: मुख्यमंत्री सहभागी झाले आहेत. याशिवाय भाजपच्या साऱ्या मंत्र्यांना आपापल्या जिल्ह्य़ांमध्ये ठाण मांडण्यास सांगण्यात आले आहे. परिणामी सध्या मंत्रालय ओस पडले आहे. वास्तविक मुख्यमंत्री नगरपालिका निवडणुकांच्या प्रचारात अपवादानेच सहभागी होतात. विभाग पातळीवर दोन-चार सभांमध्ये सहभागी झाल्याची उदाहरणे आहेत. पण फडणवीस यांनी प्रचाराकरिता गावोगावी जाण्यावर भर दिला आहे. प्रचार सभांमध्ये केंद्र व राज्य सरकारांनी केलेल्या कामांचा पाढा मुख्यमंत्र्यांकडून वाचून दाखविला जातो. निश्चलनीकरणामुळे सामान्य जनतेत सरकारबद्दल संतप्त प्रतिक्रिया आहे. या पाश्र्वभूमीवर भविष्याच्या दृष्टीने नोटाबंदीचा निर्णय कसा उपयुक्त आहे, हे जनतेच्या मनावर िबबविण्याचा प्रयत्नही मुख्यमंत्र्यांकडून होत आहे.

आधीच्या तुलनेत महापालिकांमध्ये भाजपच्या जागा वाढल्या असल्या तरी नवी मुंबई आणि वसई-विरार महापालिकांमध्ये पक्षाचा धुव्वा उडाला. भंडारा आणि गोंदिया या दोन जिल्हा परिषदांमधील सत्ता गमवावी लागली. या पाश्र्वभूमीवर नगरपालिका निवडणुकांमध्ये भाजपला फटका बसल्यास ते मुख्यमंत्र्यांसाठी राजकीयदृष्टय़ा अडचणीचे ठरू शकते. नगरपालिका निवडणुकीत भाजपची पिछेहाट झाल्यास त्याचा परिणाम आगामी महानगरपालिका आणि जिल्हा परिषद निवडणुकांमध्येही होऊ शकतो. हा धोका टाळण्याच्या उद्देशानेच मुख्यमंत्री सध्या गावोगावी दौरे करीत आहेत. भाजपची पिछेहाट झाल्यास पक्षांतर्गत विरोधक टपून बसले आहेत हे वेगळचे.

भाजपसाठी सध्या एकूण वातावरण अनुकूल नाही. यामुळेच मुख्यमंत्र्यांच्या स्वच्छ प्रतिमेचा फायदा उठविण्याचा भाजपचा प्रयत्न आहे. लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांच्या वेळी मोदी हे खणखणीत नाणे होते. आता ही जादूही तेवढी चालत नाही. यातूनच मुख्यमंत्री जास्तीत जास्त लोकांपर्यंत जाऊन मतदारांशी संवाद साधत आहेत. फडणवीस यांची प्रतिमा पक्षाला कामी येईल, असा पक्षात मतप्रवाह आहे.

  • नगरपालिका, महानगरपालिका आणि जिल्हा परिषदांच्या निवडणुकांमध्ये मुख्यमंत्र्यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे.
  • दोन वर्षांत झालेल्या महापालिका, नगरपालिका, नगर पंचायतींच्या निवडणुकांमध्ये भाजपला संमिश्र यश मिळाले. कोणत्याही पालिकेत सत्ता मिळू शकली नाही.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 22, 2016 1:53 am

Web Title: cm devendra fadnavis doing bjp election campaign for upcoming election
Next Stories
1 ‘इस्लामिक रिसर्च’च्या संकेतस्थळावर बंदी
2 बेकायदा इमारतींच्या पाडकामात अडथळे
3 वाळूमाफिया देशासाठी सर्वाधिक घातक
Just Now!
X