मुख्यमंत्र्यांचा मंत्र्यांना इशारा; मंत्र्यांसाठी आचारसंहिता लागू

पदाचा दुरूपयोग व भ्रष्टाचाराच्या आरोपावरून महसूलमंत्री एकनाथ खडसे यांचा राजीनामा घेऊन करण्यात आलेल्या कठोर कारवाईतून बोध घ्या, असा इशारा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंगळवारी रात्री भाजपच्या मंत्र्यांना दिला. भाजपच्या मंत्र्यांसाठी आचारसंहिता लागू करण्यात आली असून फाईलवर अधिकारी व सचिवांना डावलून कोणचेही निर्णय घेऊ नयेत, अशी ताकीदच देण्यात आली आहे.

खडसे यांच्या राजीनाम्याच्या पाश्र्वभूमीवर मुख्यमंत्र्यांच्या वर्षां निवासस्थानी भाजपच्यामंत्र्यांची बठक मुख्यमंत्री फडणवीस यांनी बोलाविली होती. ‘मं ना खुद खाता हँू, ना किसी को खाने देता हँू’, हा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घालून दिलेला दंडक आहे. त्यामुळे मंत्र्यांनी कोणतीही नियमब्ह्य’ा कामे करू नयेत. कक्ष अधिकाऱ्यापासून सचिवांपर्यंत अधिकाऱ्यांनी एखाद्या प्रकरणात नकारात्मक अभिप्राय फाईलमध्ये नोंदविले असतील, तर त्याविरोधात मंत्र्यांनी निर्णय घेऊ नयेत. अधिकाऱ्यांच्या मताबाहेर जाऊन नियमब्ह्य’ा कामे करू नयेत, अशी तंबी मुख्यमंत्र्यांनी दिली. मंत्र्यांच्या कामगिरीचा आता दरमहा आढावा घेतला जाणार असून प्रत्येकाला आपली कार्यक्षमता दाखवावीच लागेल. आपण लोकांना दिलेली आश्वासने पूर्ण करावीच लागतील. कार्यक्षमता न दाखविणाऱ्या मंत्र्यांना मंत्रिमंडळातून वगळावेही लागेल, असे मुख्यमंत्र्यांनी बठकीत स्पष्ट केले.

शिवसेनेकडून मुख्यमंत्र्यांचे कौतुक

एकनाथ खडसे मंत्रिपदावरून पायउतार झाल्यानंतर मंगळवारी झालेली राज्य मंत्रिमंडळाची पहिली बैठक खेळीमेळीच्या वातावरणात पार पडली. एवढी मोठी शस्त्रक्रिया करायला चांगला शल्यविशारद लागतो, अशा शब्दात अभिनंदन करीत शिवसेनेच्या मंत्र्यांनी मुख्यमंत्र्यांचे चिमटे काढले. खडसे यांनी महसूलमंत्रिपदाचा राजीनामा दिल्यानंतर मंत्रिमंडळाची पहिली बैठक आज मंत्रालयात पार पडली. बैठक सुरू होताच शिवसेनेच्या एका ज्येष्ठ मंत्र्याने खडसेंच्या राजीनाम्याचा विषय छेडला.