News Flash

वीज वाहिन्यांजवळ हेलिपॅड उभारले कसे?

लातूरमधील हेलिकॉप्टर आदळण्याच्या घटनेवरून नवे प्रश्न उपस्थित

’हवेच्या प्रक्षोभामुळे (एअर टब्र्युलन्स) मुख्यमंत्र्यांचे हेलिकॉप्टर खाली उतरवले गेल्याचे सांगण्यात येते. हवेचे प्रक्षोभ ही वातावरणातील सामान्य घटना आहे. विमान किंवा हेलिकॉप्टर हे स्थिर हवेवर तरंगत जात असते.

लातूरमधील हेलिकॉप्टर आदळण्याच्या घटनेवरून नवे प्रश्न उपस्थित

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे हेलिकॉप्टर उतरण्यासाठी निलंग्यात शाळेच्या मैदानात हेलिपॅड उभारण्यात आले होते. या मैदानाच्या जवळच वीज वाहिन्या असल्याने हे हेलिपॅड उभारण्याकरिता परवानगी कशी देण्यात आली, असा प्रश्न उपस्थित करण्यात आला आहे. अटलबिहारी वाजपेयी हे पंतप्रधान असताना उत्तन जवळील म्हाळगी प्रबोधनीत त्यांचा दौरा होता. तेव्हा हेलिकॉप्टर उतरण्याच्या टप्प्यातील वीज वाहिन्या हलविण्यात आल्या होत्या तसेच झाडे तोडावी लागली होती. विशेष सुरक्षा पथकाने (एसपीजी) ऐनवेळी लांबवर असलेल्या एका झाडाबद्दल आक्षेप घेतला होता. ते झाडही तोडावे लागले होते, असा अनुभव तेव्हा ठाणे जिल्हा प्रशासनाच्या सेवेत असलेल्या एक अधिकाऱ्याने सांगितला. मुख्यमंत्री फडणवीस हे प्रवास करीत असलेले हेलिकॉप्टर वाऱ्याचा दाब वाढल्याने  वैमानिकाने सुरक्षित उतरविण्यासाठी प्रयत्न सुरू केले असता त्याचे पंख वीजेच्या वाहिनीला धडकले. जवळच उच्च दाबाच्या वाहिन्या आणि ट्रान्सफॉर्मर होता. वीज वाहिन्या असलेल्या परिसरात हेलिपॅड उभारण्यास आक्षेप घेणे आवश्यक होते, असे मत एका वरिष्ठ सरकारी अधिकाऱ्याने व्यक्त केले.

हवेचा प्रक्षोभ म्हणजे काय?

  • ’हवेच्या प्रक्षोभामुळे (एअर टब्र्युलन्स) मुख्यमंत्र्यांचे हेलिकॉप्टर खाली उतरवले गेल्याचे सांगण्यात येते. हवेचे प्रक्षोभ ही वातावरणातील सामान्य घटना आहे. विमान किंवा हेलिकॉप्टर हे स्थिर हवेवर तरंगत जात असते. मात्र तापमान तसेच वेगवेगळ्या दिशांनी येत असलेल्या वाऱ्यांमुळे हवेत समुद्राच्या लाटांप्रमाणे स्थिती निर्माण होते व त्यामुळे विमानाला हादरे बसून ते वर-खाली किंवा एका बाजूला कलंडू शकते.
  • ’सध्या दक्षिण मध्य महाराष्ट्र व मराठवाडा येथे ढगाळ वातावरण असून काही भागात विजांच्या कडकडाटासह पाऊस पडण्याचीही शक्यता आहे. दुपारचे कडाक्याचे ऊन व वाऱ्याची उलटसुलट दिशा यामुळे हवेच्या खालच्या स्तरात लाटा निर्माण होणे शक्य आहे.
  • काही वेळा स्वच्छ हवेतही हा प्रक्षोभ असू शकतो. मात्र शक्यतो अशी स्थिती हवेच्या वरच्या थरात आढळते.
  • हवेचे प्रक्षोभ समजण्यासाठी तांत्रिक यंत्रणा विमानात तसेच हेलिकॉप्टरमध्ये उपलब्ध असते व उंचावरून प्रवास करताना अनेकदा वैमानिक असे हवेचे प्रक्षोभ टाळण्याचा प्रयत्न करतात.
  • हवामानशास्त्र विभागाकडून जमिनीपासून दहा मीटर ते दीड किलोमीटर, दीड किलोमीटर ते १० किलोमीटर व १० किलोमीटरवरील अशा तीन टप्प्यात नोंदी घेतल्या जातात. अशाप्रकारच्या अपघातांवेळी स्थानिक पातळीवरील हवामानाची माहिती केंद्रीय हवामानशास्त्र विभागाकडून सरकारकडे पाठवली जाते. यावेळीही ही माहिती पाठवण्यात आली असून त्याबद्दल अधिक बोलता येणार नाही, असे हवामानशास्त्र विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले.

पाच वर्षे हे हेलिकॉप्टर सेवेत!

मुंबई : राज्याच्या मुख्यमंत्र्यांची दररोजची धावपळ लक्षात घेऊनच राज्य सरकारने अलीकडच्या काळातच ‘सिकोस्र्की एस-७६सी’ हे अत्याधुनिक हेलिकॉप्टर खरेदी केले होते. त्याच्या देखभाल दुरुस्तीचीही खबरदारी घेण्यात आली होती. एकूणच हे हेलिकॉप्टर चांगल्या स्थितीत होते, मात्र त्याचा अपघात नेमका कशामुळे झाला हे आता नागरी उड्डाण महासंचालनालयाच्या अहवालानंतरच स्पष्ट होईल. त्यानंतर मुख्यमंत्र्यांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने आवश्यक ती खबरदारी घेतली जाईल असे सामान्य प्रशासन (राजशिष्टाचार) विभागातील उच्च पदस्थ अधिकाऱ्याने सांगितले.

राज्य सरकाच्या जुन्या हेलिकॉप्टरमध्ये सातत्याने बिघाड होत होता. त्यातून कोणतीही दुर्घटना घडू नये किंवा मुख्यमंत्र्यांच्या दौऱ्यांमध्ये अडचण निर्माण होऊ नये यासाठी सरकारने सन २०११ मध्ये ५५ कोटी रुपये खर्चून अमेरिकन बनावटीचे सिकोस्र्की एस-७६सी हे सुसज्ज हेलिकॉप्टर खरेदी करण्याचा निर्णय घेतला. पंतप्रधानांच्या विशेष  सुरक्षा पथकाच्या (एसपीजी) सल्ल्याने हे हेलिकॉप्टर खरेदी करण्यात आले होते. सहा प्रवाशांच्या क्षमतेचे हे हेलिकॉप्टरमध्ये मुख्यमंत्र्यांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने सर्व सुविधा होत्या. तसेच त्यांच्या देखभाल दुरुस्तीसाठीही कायमस्वरूपी व्यवस्था करण्यात आली असून आजवर या हेलिकॉप्टरमध्ये कधी अडचण आलेली नव्हती. आजही मुख्यमंत्री मुंबईकडे निघाले असताना हेलिकॉप्टरने टेकऑफ घेतल्यानंतर वाऱ्यामुळे हेलिकॉप्टर खाली घेण्याचा निर्णय वैमानिकाने घेतला. हेलिकॉप्टर खाली येत असतानाच अपघात घडला. हा अपघात नेमका कशामुळे घडला, मुख्यमंत्र्यांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने काही त्रुटी राहिल्या होत्या का, हे नागरी उड्डाण महासंचालनालयाच्या अहवालानंतर स्पष्ट होईल. त्यानंतर मुख्यमंत्र्यांशी चर्चा करून पुढील उपाययोजना केल्या जातील असेही या अधिकाऱ्याने सांगितले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 26, 2017 1:56 am

Web Title: cm devendra fadnavis helicopter crash
Next Stories
1 राज्यात वीजमागणीत वाढ, मंत्रालयात मात्र उधळपट्टी
2 सर्व विद्यापीठांमध्ये प्राध्यापकांच्या दोन हजार जागा रिक्त
3 साकीनाक्यात मोबाईल चोरल्याच्या संशयावरुन रिक्षाचालकाची हत्या
Just Now!
X