13 December 2018

News Flash

मुंबईकरांना दिलासा, ७०० चौ. फुटांपर्यंतच्या घरांना मालमत्ता कर करण्यास सरकार अनुकूल

कोळीवाडे, गावठाण आणि आदिवासी पाड्यांसाठी स्वतंत्र विकास नियंत्रण नियमावली

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मुंबई महापालिका क्षेत्रातील ७०० चौरस फुटांपर्यंतच्या घरांना मालमत्ता करमाफ करण्यास राज्य सरकार अनुकूल असल्याचे सांगत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुंबईकरांना दिलासा दिला आहे. तसेच मुंबईच्या विकास आराखड्यास मार्चअखेर मान्यता देण्यात येईल. कोळीवाडे, गावठाण आणि आदिवासी पाड्यांसाठी स्वतंत्र विकास नियंत्रण नियमावली तयार करण्यात येईल, असेही मुख्यमंत्र्यांनी जाहीर केले.

विधानसभेत बुधवारी सुनील प्रभू यांनी मुंबईच्या विकासाचा प्रश्न उपस्थित केला. यावर मुख्यमंत्र्यांनी उत्तर दिले. मुख्यमंत्री म्हणाले की, मुंबईचा विकास आराखडा राज्य शासनाकडे मान्यतेसाठी आला असून नगररचना विभागाच्या संचालकांनी अभिप्राय देऊन हा विकास आराखडा २ फेब्रुवारी रोजी राज्य शासनाला सादर केला आहे. हा आराखडा आल्यानंतर त्यावर अडीच वर्षांचा कालावधी शासन घेऊ शकते. मात्र या महिन्याच्या अखेर मुंबईच्या विकास आराखड्याला मान्यता देण्याचा आमचा प्रयत्न असेल, असे त्यांनी सांगितले.

या विकास आराखड्याबाबत काही धोरणं शासनाने आखली आहेत. त्यात मोकळ्या भूखंडाबाबत कुठलीही तडजोड करण्यात येणार नाही. न्यायालयाचा निर्णय किंवा काही तांत्रिक अडचणी असतील असे मुद्दे वगळता मोकळ्या भूखंडाबाबत तडजोड केली जाणार नाही, असे ते म्हणालेत.

मुंबई महापालिका हद्दीतील ५०० ते ७०० चौरस फुटांपर्यतच्या घरांना मालमत्ता कर माफ करण्यास राज्य शासन अनुकूल आहे. यासंदर्भात महापालिकेने वैधानिक कार्यवाही करून तसा प्रस्ताव तातडीने शासनाकडे पाठवावा, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

मुंबईत वर्षभरात आगीच्या १५ घटना घडल्या असून त्यातील साकी नाका आणि कमला मिलला लागलेली आग या दोन मोठ्या आगीच्या घटना आहेत. त्याची चौकशी सुरू असल्याचे त्यांनी विधानसभेत सांगितले.

राज्यातील शहरी भागात २० लाख घरांची आवश्यकता असून त्यातील ५० टक्के घरांची मागणी मुंबई महानगर प्रदेशातून आहे. मुंबईत १ लाख ९७ हजार ८३१ घरांना मान्यता देण्यात आली आहे. सार्वजनिक-खासगी भागीदारी तत्वावरील दोन लाख घरांच्या निविदा काढण्यात आली आहे. सध्या मुंबई व महानगर प्रदेशात ५ लाख घरे बांधकामाधीन असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

First Published on March 14, 2018 5:10 pm

Web Title: cm devendra fadnavis in vidhan sabha on exemption from property tax mumbai development plan