पंतप्रधान नरेंद्र मोदी अविश्रांतपणे काम करतात, याबद्दलचे वृत्त तुम्ही वाचले असेल. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी रात्री उशिरापर्यंत कार्यालयीन कामकाज केल्याचेदेखील तुम्ही ऐकेल किंवा वाचले असेल. आता तेच कल्चर राज्यातही पाहायला मिळते आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल मध्यरात्री मुंबईतील मेट्रो प्रकल्पांच्या कामांचा आढावा घेतला आहे. शहरातील मेट्रो प्रकल्पांचा आढावा घेण्यासाठी मुख्यमंत्री मध्यरात्री निघाले आणि त्यांनी पाच मेट्रो प्रकल्पांचा आढावा घेतला. सुरक्षेच्या कारणामुळे सामान्य जनतेला त्रास होऊ नये, यासाठी देवेंद्र फडणवीस यांनी मध्यरात्री मेट्रो प्रकल्पांचा आढावा घेतल्याची माहिती मुख्यमंत्री कार्यालयातील सूत्रांनी दिली.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मध्यरात्री साडे तीन वाजता मुंबईतील मेट्रो प्रकल्पांचा आढावा घेण्यासाठी निघाले. ‘मुंबई मेट्रोसाठी आम्ही प्रिकास्ट तंत्रज्ञानाचा वापर केला आहे. या तंत्रज्ञानांतर्गत मेट्रोच्या बांधकामासाठी आवश्यक असणारे बहुतांश साहित्य दुसऱ्या ठिकाणाहून आणले जाते. यामुळे मेट्रोचे काम सुरु असलेल्या ठिकाणी आवश्यक पार्ट्स आणून जोडले जातात,’ असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.

‘प्रिकास्ट तंत्रज्ञानाच्या वापरामुळे मेट्रोच्या बांधकामाला वेग आला आहे. यामुळे मुंबईतील मेट्रोच्या निर्मितीचा वेग देशातील कोणत्याही मेट्रोच्या बांधकामाच्या वेगापेक्षा जास्त आहे,’ असेदेखील मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले. मुख्यमंत्र्यांनी मालाडमधील मेट्रो लाईन क्रमांक ७ वरील पुलाचादेखील आढावा घेतला. यावेळी मुख्यमंत्र्यांसोबत एमएमआरडीएचे अधिकारीदेखील उपस्थित होते.

मुंबईतील वाढती लोकसंख्या, त्यामुळे लोकलमध्ये वाढलेली गर्दी, सार्वजनिक वाहतुकीला करावा लागणारा सामना यामुळे मुंबईत मेट्रोची उभारणी केली जाते आहे. २०१६ मध्ये मेट्रोल प्रकल्पांच्या निर्मितीला सुरुवात झाली असून त्यासाठी ४० हजार कोटींचा खर्च अपेक्षित आहे. मुंबईमध्ये एलिवेटेड आणि अंडरग्राऊंड मेट्रोचे काम सुरु आहे. २०१९ मध्ये मुंबईत जवळपास ७५ किलोमीटरचा मेट्रो मार्ग अस्तित्वात असणार आहे. ९ लाख मुंबईकर मेट्रोचा वापर करणार असल्याचा अंदाज व्यक्त केला जातो आहे. याआधी युवासेनेचे अध्यक्ष आदित्य ठाकरे यांनी मध्यरात्री मुंबईतील रस्त्यांच्या डागडुजीच्या कामाचा आढावा घेतला होता.