बाळासाहेब ठाकरे स्मृती मातोश्री ग्रामपंचायत बांधणी योजना

स्वतंत्र इमारती नसलेल्या राज्यातील ग्रामपंचायतींसाठी इमारत बांधण्याच्या योजनेला शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे नाव देण्यामागे भाजप आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे गणित काय असावे, याची राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाली आहे. खेडय़ापाडय़ांमध्ये बाळासाहेबांच्या नावाने इमारती उभ्या राहणार असल्याने त्याचा शिवसेनेला राजकीय फायदा होऊ शकतो.

भाजप आणि शिवसेनेतील संबंध गेल्या वर्षी महानगरपालिका निवडणुकांपासून कमालीचे ताणले गेले आहेत. शिवसेनेने तर तुटेपर्यंत ताणले होते. युती करून शिवसेनेची २५ वर्षे कुजली व यापुढे युती नाही, असे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी जाहीर केले होते. शिवसेनेवर राजकीय कुरघोडी करण्याची एकही संधी भाजप सोडत नाही. तरीही अलीकडे भाजपने शिवसेनेबाबत धोरण थोडेसे नरमाईचे घेतल्याचे बोलले जाते.

दोनच दिवसांपूर्वी झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत स्वतंत्र इमारती नसलेल्या राज्यातील ग्रामपंचायतींना स्वत:ची इमारत उभारण्याकरिता शासनाकडून आर्थिक मदत दिली जाणार आहे. एकूण खर्चाच्या ९० टक्के अनुदान शासनाकडून मिळणार आहे. या योजनेनुसार एक हजारांपेक्षा कमी लोकसंख्या असलेल्या गावांमध्ये १२ लाख, तर एक ते दोन हजारांपर्यंत लोकसंख्या असलेल्या गावांना १८ लाख रुपये देण्यात येणार आहेत. या योजनेचे नामकरण बाळासाहेब  ठाकरे स्मृती मातोश्री ग्रामपंचायत बांधणी योजना असे करण्यात आले आहे. पुढील चार वर्षांत ही योजना राबविण्यात येणार असून त्यासाठी ४४० कोटींची तरतूद करण्यात आली आहे. यंदाच्या वर्षी पुढील दोन महिन्यांत २५ कोटी रुपये दिले जाणार आहेत. या योजनेचा पाच हजारांपेक्षा जास्त ग्रामपंचायतींना लाभ होऊ शकतो.

शिवसेनेकडे असलेल्या खात्यांच्या योजनांमध्ये बाळासाहेब ठाकरे यांच्या नावे योजना सुरू करण्याचा आग्रह धरला जातो; पण ग्रामविकास हे खाते भाजपच्या पंकजा मुंडे यांच्याकडे आहे. तरीही बाळासाहेबांचे नाव देण्यात आल्याने मुख्यमंत्र्यांनी शिवसेनेला का बरे खूश केले असावे याचे वेगवेगळे तर्कवितर्क व्यक्त केले जात आहेत. आगामी निवडणुकांमध्ये काँग्रेस आणि राष्ट्रवादी एकत्र येण्याची शक्यता आहे. दोन्ही काँग्रेसने याबाबत सकारात्मक भूमिका घेतली आहे. भाजप, शिवसेना आणि काँग्रेस व राष्ट्रवादी एकत्र अशी तिरंगी लढत झाल्यास भाजपपुढे आव्हान उभे राहू शकेल. शेतकरी व विशेषत: ग्रामीण भागात भाजपबद्दल तेवढी आपुलकी राहिलेली नाही हे गुजरातच्या निकालावरून स्पष्ट झाले. अशा वेळी शिवसेनेची एकदम नाराजी नको, अशी मुख्यमंत्र्यांची खेळी असू शकते.

शिवसेनेच्या दृष्टीने संवेदनशील असलेल्या बाळासाहेबांच्या स्मारकाचा मुद्दाही मुख्यमंत्र्यांनी मार्गी लावला. यापाठोपाठ खेडोपाडी बाळासाहेबांचे नाव पोहोचण्यास मदत केल्याने मुख्यमंत्र्यांच्या मनात नेमके काय घोळत आहे, असा प्रश्न उपस्थित झाला आहे.