एसी लोकल आणि मेट्रोनंतर आता मुंबईकरांचा प्रवास अधिक सुखकारक आणि प्रदुषणमुक्त होणार आहे. कारण, मुंबईकरांच्या सेवेसाठी २५ हायब्रीड इलेक्ट्रिक बस सेवेचा ताफा दाखल करण्यात आला आहे. ‘एमएमआरडीए’च्या वतीने वांद्रे-कुर्ला संकुलात ही हायब्रीड बस सेवा सुरु करण्यात आली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते या बस सेवेचे सह्याद्री अतिथीगृह येथून उद्घाटन करण्यात आले. या सेवेचा जास्तीत जास्त मुंबईकरांनी लाभ घेण्याचे आवाहन यावेळी मुख्यामंत्र्यांनी केले.
Maharashtra CM Devendra Fadnavis launched 25 hybrid buses by Mumbai Metropolitan Region Development Authority(MMRDA) under National Electric Mobility Mission Plan 2020. Union Minister Anant Geete also present pic.twitter.com/TRxhPSnDb2
— ANI (@ANI) March 16, 2018
यावेळी मुख्यमंत्री म्हणाले, वाहतूक कोंडी व वाहनांच्या प्रदुषणावर सार्वजनिक वाहतुकीचा जास्तीत जास्त वापर हाच उपाय असून यापुढील काळात १०० टक्के इलेक्ट्रिक मोबिलीटीवर आधारित सार्वजनिक वाहतूक व्यवस्था उभारण्यासाठी प्रयत्न करण्यात येणार आहेत. भविष्यात सर्व बसेस या इलेक्ट्रिकवर चालविल्या जातील.
वांद्रे-कुर्ला संकुलात मोठ्या प्रमाणात गाड्या येत असल्यामुळे वाहतूक कोंडी व प्रदूषण होत आहे. ‘एमएमआरडीए’ने उड्डाणपूल बांधून सिमलेस वाहतुकीसाठी उपाय योजना केल्या आहेत. कितीही रस्ते बांधले तरी सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेचा वापर झाल्याशिवाय ही कोंडी कमी होणार नाही. सार्वजनिक वाहतूक हाच यावरचा उपाय आहे. भविष्यात इलेक्ट्रिक वाहतूक व्यवस्थेकडे जावे लागणार आहे. पुढील काळात सर्व बसेस या संपूर्ण इलेक्ट्रिकवर आणण्यात येतील. राज्यातील सार्वजनिक वाहतूक व्यवस्था ही इलेक्ट्रिक मोबिलिटीवर आणण्यात येणार आहे असून त्यासाठीचे चार्जिंग धोरण तयार केले आहे. मुंबईतील ‘बेस्ट’ला सुद्धा आपल्या सर्व बस या इलेक्ट्रिक कराव्या लागणार आहेत. यासाठी केंद्र व राज्य सरकार त्यांना सर्वतोपरी मदत करेल, असे आश्वासन यावेळी मुख्यमंत्र्यांनी दिले.
‘एमएमआरडी’च्यावतीने सुरू करण्यात आलेल्या या हायब्रीड बस वांद्रे-कुर्ला संकुलात येणाऱ्यांना नक्कीच आवडतील. वातानुकूलित, वायफाय, आरामदायी अशा या बस असल्यामुळे यामधून लोकांना कामही करता येईल. या बसेसमुळे बीकेसीमध्ये येणाऱ्या गाड्याची संख्या कमी होईल. तसेच ३० ते ४० टक्के प्रदूषण सुद्धा कमी होण्यास मदत होणार आहे. यामुळे या ठिकाणी येणाऱ्या नागरिकांनी या हायब्रीड बस सेवेचा जास्तीत जास्त वापर करावा, असे आवाहनही मुख्यमंत्री फडणवीस यांनी यावेळी केले. दरम्यान, बेस्टसाठी आणखी ८० इलेक्ट्रिक बस देणार असल्याचे यावेळी केंद्रीय अवजड उद्योग मंत्री अनंत गीते यांनी केले आहे.
हायब्रीड बसची वैशिष्ट्ये :
• ३१ अधिक १ अशा आसन क्षमतेच्या एकूण 25 बसेस चालविणाऱ्या जाणार
• बोरिवली, ठाणे, मुलुंड, खारघर ते वांद्रे-कुर्ला संकुल या मार्गावर चालणार
• सकाळी ७.३० ते ८.३० आणि सायं. ६ ते ७ या वेळेत फेऱ्या चालणार
• वांद्रे-कुर्ला संकुल परिसरात तसेच जवळच्या रेल्वे स्थानकादरम्यान शटल सेवा
• बेस्टमार्फत ही सेवा चालविण्यात येणार
• भारतातील हायब्रीड श्रेणीतील मेक इन इंडिया अंतर्गत उत्पादित पहिली बस
• हायब्रीड तंत्रज्ञानामुळे कार्बन उत्सर्जनावर ३० टक्के बचत
• इतर बसेसच्या तुलनेत २८.२४ टक्के इंधन बचत
• संपूर्ण इलेक्ट्रॉनिक किंवा फ्युएल सेलमध्ये परिवर्तन करण्याची क्षमता
• संपूर्ण वातानुकुलित, टीव्ही, वायफाय, सीसीटीव्ही सुविधा
• आरामदायी आसन व्यवस्था, दिव्यांगासाठी विशेष आसन व व्हिलचेअरसाठी उताराची व्यवस्था
• गिअरलेस व क्लचलेस कार्यपद्धती
• जीपीआरएस यंत्रणा
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on March 16, 2018 6:44 pm