भाजप-सेना खणाखणी टाळण्याच्या सूचना

शिवसेना व भाजप नेत्यांमध्ये सध्या खणाखणी सुरू असल्याने उभयपक्षी निर्माण झालेला तणाव कमी करण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शिवसेना-भाजप मंत्र्यांशी गुरुवारी चर्चा केली. दोन्ही पक्षाच्या नेत्यांनी आरोप-प्रत्यारोप किंवा वादग्रस्त वक्तव्ये टाळावीत, अशा सूचना त्यांनी दिल्या.

भाजप खासदार किरीट सोमय्या यांनी महापालिकेतील ‘माफिया राज’ असे संबोधन करून पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनाही लक्ष्य केले आहे. माफियांनी हल्ला केल्याचा आरोप करीत पोलीस आयुक्तांना चौकशी करण्याबाबत पत्रही दिले आहे. मुंबई भाजप अध्यक्ष अ‍ॅड. आशीष शेलार यांनी काही वक्तव्ये केली. त्याबाबत शिवसेना मंत्र्यांनी मुख्यमंत्र्यांकडे आक्षेप नोंदविला. शिवसेना खासदार संजय राऊत यांच्या वादग्रस्त वक्तव्याचा मुद्दा भाजपच्या मंत्र्यांनी मांडला. सरकारमध्ये एकत्र असताना जाहीर वादविवाद टाळावेत, अशी अपेक्षा मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केल्याचे सूत्रांनी सांगितले.

मुख्यमंत्र्यांनी जानकरांना जाब विचारला ?

मुख्यमंत्री फडणवीस यांनी वादग्रस्त वक्तव्ये केलेल्या व पंकजा मुंडे समर्थक पशुसंवर्धनमंत्री महादेव जानकर यांना जाब विचारीत आपली नाराजी व्यक्त केल्याचे सूत्रांनी सांगितले. भगवानगड येथे पंकजा मुंडे यांचे समर्थन करीत जानकर यांनी शरद पवार, अजित पवार, धनंजय मुंडे यांच्याबाबत वक्तव्ये केली होती. ग्रामविकासमंत्री पंकजा मुंडे यांची वक्तव्ये, भगवानगड येथे घेतलेली सभा आणि कुपोषणाबाबत बोलाविलेल्या बैठकीस मारलेली दांडी याबाबत मात्र मुख्यमंत्र्यांनी मौन पाळणेच पसंत केले आहे.