गेल्या काही दिवसांत भाजप आणि शिवसेना यांच्यात सुरू असलेल्या खणाखणीच्या पार्श्वभूमीवर रविवारी रात्री अनपेक्षित अशी राजकीय घडामोड पाहायला मिळाली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज अचानक शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या भेटीसाठी मातोश्रीवर दाखल झाले. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, देवेंद्र फडणवीस मातोश्रीवर उद्धव ठाकरे यांच्यासोबत रात्रीचे भोजन करणार आहे. त्यामुळे फडणवीस यांच्या या डिनर डिप्लोमसीचे नेमके प्रयोजन काय असावे, हे कोडे राजकीय वर्तुळातील अनेकांना पडले आहे. गेल्या काही दिवसांत शिवसेना आणि भाजप या दोन्ही पक्षांकडून परस्परांवर कुरघोडी करण्याची एकही संधी सोडण्यात आली नव्हती. त्यामुळे दोन्ही पक्षांतील नेतृत्त्वात विसंवाद निर्माण झाल्याची चर्चा आहे. त्यामुळे आजच्या भेटीमुळे दोन्ही पक्षांतील संबंध काहीप्रमाणात तरी पूर्ववत होणार का, हे पाहणे औत्स्युकाचे ठरेल.
याशिवाय, पुढीलवर्षी होऊ घातलेल्या मुंबई महानगरपालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर दोन्ही पक्षांचे नेते एकमेकांविरुद्ध आक्रमक होताना दिसत आहेत. दोन्ही पक्षांतील शाब्दिक युद्धाची पातळी दिवसेंदिवस खालावताना दिसत आहे.  नुकत्याच झालेल्या केंद्रीय मंत्रिमंडळ विस्तारात भाजपकडून शिवसेनेला डावलण्यात आले होते.