News Flash

कागदोपत्री उपाययोजना काय कामाच्या?

उपाययोजना कायदावरच असून एकमेकांवर जबाबदाऱ्या झटकून चालणार नाही.

राज्यात खरीपासाठी खते आणि बियाण्यांची पुरेशी तरतूद करण्यात आली आहे. तसेच महाबीजमार्फत विक्री करण्यात येणाऱ्या बियाण्यांच्या दरवाढीसही स्थगिती देण्यात आली आहे.

द्रुतगती महामार्गावरील अपघातावरून मुख्यमंत्र्यांचा अधिकाऱ्यांवर संताप

यशवंतराव चव्हाण द्रुतगती महामार्गावर सातत्याने होत असलेल्या अपघातावरून संतप्त झालेल्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्य रस्ते विकास महामंडळ आणि महामार्ग पोलिसांना मंगळवारी चांगलेच झापले. या महामार्गावर सातत्याने अपघात होत आहेत. अनेक उपाययोजना केल्याचे तुम्ही सातत्याने सांगता. मात्र तुमच्या उपाययोजना केवळ  कागदावरच असून लोकांचे जीव वाचवू न शकणाऱ्या असल्या कागदोपत्री उपाययोजना काय कामाच्या? तुमचे हात कोणी बांधले आहेत? वाहन चालविण्यासाठी कायदे आहेत याची जरब लोकांमध्ये कधी निर्माण होणार, अशा शब्दात मुख्यमंत्र्यांनी अधिकाऱ्यांना फैलावर घेतले.

द्रुतगती महामार्गावरील अपघाताबाबत आज मंत्रालयात पार पडलेल्या उच्चाधिकार समितीच्या बैठकीत हे अपघात रोखण्यासाठी कठोर उपाययोजना करण्याचे आदेश मुख्यमंत्र्यांनी दिले. महामार्गावरील अपघात रोखण्यासाठी संपूर्ण महामार्गावर इंटेलिजंट ट्रॅफिक मॉनिटिरग सिस्टिम उभारण्याचा निर्णय यावेळी घेण्यात आला. द्रुतगती महामार्गावरील सुरक्षित प्रवासासाठी आजवर काय उपाययोजना केल्या, याचे सादरीकरण रस्ते विकास महामंडळाचे उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक राधेश्याम मोपलवार यांनी केले. तर सुरक्षित प्रवासासाठी आणखी काय करायला हवे, याचे सादरीकरण बांठिया आणि पेंडसे यांनी केले.

तेव्हा तुमच्या उपाययोजना कागदावरच असून वाहन चालकांमध्ये भीती नाही, नियमांचे सर्रास उल्लंघन होत आहे. अशा परिस्थितीत तुम्ही काय करता असा थेट सवाल करीत मुख्यमंत्र्यांनी अधिकाऱ्यांना खडसावले. त्याचप्रमाणे महामार्गाच्या व्यवस्थापनाचे नियंत्रण एमएसआरडीसीने स्वत:च्या हातात घ्यावे. उपाययोजना कायदावरच असून एकमेकांवर जबाबदाऱ्या झटकून चालणार नाही. या महार्गावरील अपघात बंद झाले पाहिजेत. वाहनचालकांमध्ये भीती निर्माण झाली पाहिजे अशा कठोर उपाययोजना करा असे आदेशही त्यांनी दिले.

बैठकीत या महामार्गावर इंटेलिजंट ट्रॅफिक मॉनिटिरग सिस्टिम उभारण्याचा निर्णय घेण्यात आला. या अंतर्गत कमांड सेंटरसह सर्व संबंधित यंत्रणांशी समन्वय साधून तातडीने प्रतिसाद देणारी यंत्रणा उभारण्यात येणार आहे. संपूर्ण महामार्गावर सीसीटीव्हीचे जाळे उभे केले जाणार असून ओव्हरस्पीिडग, लेन कटिंग आणि ड्रंक अँड ड्राइव्हच्या प्रकरणांमध्ये कठोर कारवाई केली जाणार आहे. ओझर्डे येथे एमएसआरडीसीच्या माध्यमातून उभारण्यात आलेले ट्रॉमा सेंटर तातडीने चालू करण्याचा निर्णयही या बठकीत घेण्यात आला. एअर अँब्युलन्सचा प्रस्तावही तातडीने मार्गी लावण्याचा निर्णय घेण्यात आला. या बैठकीत एकनाथ शिंदे यांनीही अधिकाऱ्यांना धारेवर धरले. त्याचप्रमाणे या रस्त्याच्या देखभाल दुरूस्तीकडे दुर्लक्ष करणाऱ्या आयआरबी कंपनीच्या अधिकाऱ्यांनाही खडसावण्यात आले. करारनाम्यात तरतूद नसली तरी तुम्हाला जबाबदारी झटकता येणार नाही. अपघात नियंत्रणात आणण्यासाठी उपाययोजना कराव्याच लागतील अन्यथा ठेकेदारावर कारवाई केली जाईल असा इशाराही शिंदे यांनी दिला.

यंदाही दरडी कोसळण्याचा धोका

मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावर गेल्या वर्षी आडोशी बोगद्याजवळ दरडी कोसळल्याने मोठी दुर्घटना घडली होती. दरडी कोसळू नयेत, यासाठी दुरुस्तीचे काम ९० टक्के पूर्ण झाले असून आणखी चार ते पाच ठिकाणी दरडी कोसळण्याचा धोका निर्माण झाला आहे. आडोशी बोगदा, अमृतांजन पूल आणि खंडाळा या ठिकाणी दरडी कोसळण्याचा धोका निर्माण झाला असून त्या ठिकाणी दुरुस्तीचे काम हाती घेण्यात येईल, अशी माहिती एकनाथ शिंदे यांनी दिली.

उपाययोजनांचा तपशील सादर करण्याचे आदेश

पनवेल येथे झालेल्या रस्ते अपघाताची मुंबई उच्च न्यायालयाने मंगळवारी गंभीर दखल घेतली. तसेच गेल्या वर्षभरात राज्यात किती रस्ते अपघात झाले आहेत आणि हे अपघात रोखण्यासाठी काय उपाययोजना केल्या जात आहेत याचा तपशील सादर करण्याचे आदेश न्यायालयाने मंगळवारी राज्य सरकारला दिले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 8, 2016 3:38 am

Web Title: cm devendra fadnavis slam on state road development corporation officers and the highway police
Next Stories
1 भाजप-शिवसेनेचा ‘मेट्रोवाद’ चव्हाटय़ावर
2 खडसेंवरच्या कारवाईवरून धडा घ्या!
3 राज्यभरातील एसटीच्या २५२ बस आगारात सीसीटीव्ही!
Just Now!
X