२०१९ ची निवडणूक ही भाजपासाठी नव्हे तर भारतासाठी आहे. गेल्या ५ वर्षांत देशाने अनेक ऐतिहासिक क्षण पाहिले आहेत. २०१९ हे वर्ष भारताचे भविष्य आणि भवितव्य खऱ्या अर्थाने कुठे जाईल हे ठरवणारे आहे. त्यामुळे देशातील जनतेने महाआघाडीचे खिचडी सरकार सत्तेवर आणण्यापेक्षा भाजपाच्या नेतृत्वाखालील एनडीएला बहुमताने सत्तेत आणावे असे आवाहन, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले. तसेच २०१४ मध्ये काँग्रेसमध्ये असलेले अनेक लोक भाजपात असून काँग्रेस हा रिकामा पक्ष असल्याचा टोलाही त्यांनी लगावला.

एका पुस्तक प्रकाशन सोहळ्यात ते बोलत होते. आगामी निवडणुकीत महाआघाडीचे खिचडी सरकार सत्तेवर आले तर भारताची ती ऐतिहासिक चूक असेल, असे म्हणता येईल. देश १०० वर्षे मागे जाईल. माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्यावर नाव न घेता टीका करताना ते म्हणाले की, यापूर्वीचे पंतप्रधान हे कुठलाही निर्णय घेऊ शकत नसत. त्यांना कोणाला तरी विचारल्याशिवाय त्यांना बोलताही येत नसत. पाच वर्षांत निर्णय न घेणे यामुळे देशाचा विकास खुंटला.