समुद्रकिनाऱ्यांच्या स्वच्छतेसंदर्भात धोरण निश्चितीचे मुख्यमंत्र्यांचे आश्वासन

गेल्या दोन आठवडय़ांपासून स्थगित असलेल्या वर्सोवा समुद्रकिनारा स्वच्छता मोहिमेला शनिवारपासून पुन्हा सुरुवात करण्यात आली. स्वच्छता मोहिमेच्या दुसऱ्या दिवशी म्हणजे रविवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी वर्सोवा किनाऱ्याला भेट दिली. समुद्रकिनाऱ्यांच्या स्वच्छतेसंदर्भात राज्य सरकार लवकरच धोरण निश्चित करणार असल्याची घोषणा मुख्यमंत्र्यांनी या वेळी केली.

वर्सोवा किनारा स्वच्छता मोहिमेला शनिवारपासून पुन्हा सुरुवात करत असल्याची घोषणा अफरोज शहा यांनी गुरुवारी केली होती. स्वच्छतेच्या कामात स्थानिक गुंडांनी घातलेला खोडा आणि पालिका प्रशासनाने कचरा उचलण्याबाबत दाखविलेल्या उदासीनतेच्या कारणामुळे मोहीम थांबवत असल्याचे १९ नोव्हेंबर रोजी जाहीर केले होते. या पाश्र्वभूमीवर काही दिवसांपूर्वी शहा यांनी स्थानिक रहिवाशांसह देवेंद्र फडणवीस आणि आदित्य ठाकरे यांची भेट घेतली होती. मोहिमेची सुरक्षा आणि कचरा व्यवस्थापनासंबंधीच्या मागण्यांची पूर्तता होईपर्यंत मोहिमेला सुरुवात करणार नसल्याचे शहा यांनी सांगितले होते.

गेल्या आठवडय़ात पालिका प्रशासनाने साचलेला कचरा उचलला. तसेच पोलिसांकडून गस्त सुरू झाल्याने स्वच्छता मोहीम पुन्हा सुरू केल्याची माहिती शहा यांनी दिली. त्यानुसार शनिवार-रविवारी स्वच्छता मोहिमेचा १११ वा आठवडा पार पडला. रविवारी दुपारी ३ ते ५ या कालावधीत स्वच्छता मोहीम राबविण्यात आली. या वेळी मुख्यमंत्री फडणवीस आणि आदित्य ठाकरे यांच्यासह राजकीय पक्षाचे कार्यकर्ते, स्थानिक आमदार, नगरसेवक आणि पालिका कर्मचारी हजर होते. सोमय्या महाविद्यालयाचे विद्यार्थी आणि उपस्थितांसह मुख्यमंत्र्यांनी पर्यावरणाच्या संवर्धनाबाबत शपथ घेतली. त्यानंतर त्यांनी स्वयंसेवकांच्या बरोबरीने स्वच्छता केली.