विजय गौतम यांना वित्त विभागातूनही दोनच महिन्यांत हलविले

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शनिवारी डझनभर अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे आदेश दिले आहेत. त्यानुसार वित्त विभागाचे प्रधान सचिव विजय गौतम यांची अवघ्या दोन महिन्यात पुन्हा बदली करण्यात आली आहे. त्याच वेळी प्रदीर्घ काळापासून गृहनिर्माण विभागात ठाण मांडलेले बी. जी. पवार यांची सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारीपदी झालेली बदली पुन्हा एकदा रद्द करण्याची नामुष्की सरकारवर ओढवली आहे.

मुख्य सचिव सुमित मलिक यांची  मुख्य माहिती आयुक्तपदी नियुक्ती झाल्याने प्रशासनात  फेरबदल होण्याची होती. शेतकऱ्यांच्या कर्जमाफी योजनेत माहिती आणि तंत्रज्ञान विभागाने घातलेल्या घोळानंतर विभागाचे तत्कालीन प्रधान सचिव विजय गौतम यांची  वित्त विभागात बदली करण्यात आली होती. मात्र  दोन महिन्यात गौतम यांची  वित्त विभागातून पर्यटन विभागात प्रधान सचिव म्हणून बदली करण्यात आली आहे. गृहनिर्माण विभागात प्रदीर्घ काळापासून असलेले सहसचिव बी.जी. पवार यांची सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारीपदी झालेली बदली अवघ्या महिनाभरात रद्द करण्यात आली आहे.

सिंधुदुर्ग जिल्हाधिकारी आपल्यापेक्षा कनिष्ठ असल्याने जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून जिल्हाधिकाऱ्यांच्या आधिपत्याखाली काम करण्यास पवार यांनी नकार दिल्याने त्यांची बदली रद्द करण्यात आल्याचे सूत्रांनी सांगितले. एम.जी. गुरसल यांच्याकडे शिक्षण शुल्क नियंत्रण नियमन प्राधिकरणाच्या सचिवपदी नियुक्ती करण्यात आली आहे.  औरंगाबाद विभागीय आयुक्त पुरुषोत्तम भापकर यांची पशुसंवर्धन आणि  दुग्धविकास सचिवपदी बदली करण्यात आली असून त्यांच्या जागी  एस.एन. केंद्रेकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे. के.एच.कुलकर्णी यांची आदिवासी संशोधन आणि प्रशिक्षण संस्थेचे आयुक्त म्हणून, ए. ए.  गुल्हाणे यांची वर्धा जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारीपदी, के. मंजूलक्ष्मी यांची सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारीपदी, निमा आरोरा यांची जालना जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारीपदी तर अमोल एडगे यांची बीड जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारीपदी बदली करण्यात आली आहे.