वारंवार वीजपुरवठा खंडीत होत असल्याने त्रस्त झालेल्या शेतक-यांना आता दिलासा मिळाला आहे. शेतक-यांना पुढील तीन महिने दिवसाच्या वेळी अखंड वीज पुरवठा करा असे आदेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महावितरणला दिले आहेत.
शेतक-यांच्या वीजेविषयीच्या समस्यांसंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महावितरणच्या वरिष्ठ अधिका-यांची मंगळवारी बैठक घेतली. या बैठकीत मुख्यमंत्र्यांनी कृषी पंपांना पुढील तीन महिने दिवसा १२ तास अखंड वीज पुरवठा करा असे आदेश दिलेत. मुख्यमंत्र्यांनी ट्विटरव्दारे ही माहिती दिली. या निर्णयामुळे शेतक-यांना दिवसा शेतीसाठी जलयुक्त शिवारांतर्गत तयार झालेल्या शेततळ्यांमधून पाणी घेणे शक्य होणार आहे. मुख्यमंत्र्यांनी सर्वात कमी पाऊस झालेल्या भागांची यादी तयार करण्याचे आदेशही दिले. स्वतःची सिंचन व्यवस्था नसलेल्या शेतक-यांचा यात समावेश केला जाईल. याशिवाय पोलिस अधिका-यांनी प्रत्येक जिल्ह्यात महावितरणसाठी दोन ते तीन पोलीस स्टेशन सुरु करावेत असे निर्देश मुख्यमंत्र्यांनी दिलेत. या पोलीस ठाण्यांमध्ये वीजचोरीविषयीचे गुन्हे दाखल करणे शक्य होणार आहे. महावितरणच्या भरारी पथकांनी वीजचोरीवर नजर ठेऊन कारवाई करावी. यातून वीजचोरीमुळे होणारे नुकसान भरुन निघेल आणि त्याचा फायदा शेतक-यांना देता येईल असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.
मुख्यमंत्र्यांनी बैठकीत सौरउर्जेवर चालणा-या फिडरचा आढावा घेतला. महावितरणने तातडीने प्रायोगिक प्रकल्प सहा महिन्यात पूर्ण करावे असे निर्देशही मुख्यमंत्र्यांनी दिले आहेत.