भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी स्थापन झालेल्या महाविकास आघाडीमध्ये योग्य संवाद असावा व यासाठी काँग्रेस पक्षाकडे सहकार्याची अपेक्षा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी काँग्रेस पक्षाध्यक्षा सोनिया गांधी यांच्याकडे व्यक्त केली. सोनियांच्या भेटीनंतर लगेचच दुसऱ्या दिवशी काँग्रेस नेते मनीष तिवारी यांनी ठाकरे यांना नागरिकत्व सुधारणा कायद्यावरून सल्ला दिल्याने काँग्रेसमध्ये शिवसेनेबाबत सारे काही आलबेल नाही हेच सिद्ध झाले.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांनी शुक्रवारी काँग्रेस पक्षाध्यक्षा सोनिया गांधी यांची त्यांच्या १०, जनपथ निवासस्थानी भेट घेतली. महाविकास आघाडीत शिवसेना आणि राष्ट्रवादीत योग्य समन्वय असला तरी काँग्रेस पक्षाच्या नेत्यांची तोंडे वेगवेगळ्या दिशेला असल्याने काही वेळा काँग्रेसकडून वेगळी भूमिका मांडली जाते. ही बाब उद्धव ठाकरे यांनी सोनियांच्या निदर्शनास आणून दिल्याचे सांगण्यात आले.

नागरिकत्व सुधारणा कायदा, स्वातंत्र्यवीर सावरकर यांना भारतरत्न देण्याचा ठराव अशा काही मुद्दय़ांवर शिवसेना आणि काँग्रेसमध्ये वेगवेगळे मतप्रवाह आहेत. नागरिकत्व सुधारणा कायद्यावर सोनिया गांधी आणि राज्याचे प्रभारी मल्लिकार्जुन खरगे यांनी पक्षाची भूमिका मुख्यमंत्र्यांकडे स्पष्ट केल्याचे काँग्रेसच्या गोटातून सांगण्यात आले. काँग्रेस पक्ष आपल्या भूमिकेपासून दूर जाणार नाही, असेही स्पष्ट करण्यात आले.

महाविकास आघाडी सरकारमध्ये निर्णय घेताना काँग्रेस पक्षालाही विश्वासात घेण्याचा सल्ला देण्यात आला. सरकारमध्ये विसंवाद होणार नाही या दृष्टीने प्रयत्न करण्याचे आश्वासन ठाकरे यांनी दिले.

काँग्रेस पक्ष आपल्या तत्त्वांना तिलांजली देणार नाही आणि सरकारचा कारभार किमान समान कार्यक्रमावर आधारित चालावा, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली.