पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या परदेश दौऱ्याबद्दल टीका केली जात असतानाच राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचेही परदेश दौरे अलीकडे वाढले आहेत. नुकताच सहा महिन्यांचा कालावधी पूर्ण केलेले मुख्यमंत्री चौथ्या परदेश दौऱ्यावर गेले आहेत.
पंतप्रधान मोदी यांच्यासोबत मुख्यमंत्री फडणवीस गुरुवारी पहाटे चीन दौऱ्यावर रवाना झाले. महाराष्ट्रात विदेशी गुंतवणूकदारांना आकर्षित करण्याकरिता या दौऱ्याचा उपयोग करून घेतला जाणार आहे. गेल्या दोन महिन्यांतील मुख्यमंत्र्यांचा हा तिसरा परदेश दौरा असून, मुख्यमंत्रिपद स्वीकारल्यापासूनचा हा चौथा परदेश दौरा आहे. कोणताही मुख्यमंत्री परदेश दौऱ्यावर गेल्याने विदेशी गुंतवणूकदार किती आकर्षित होतात हा नेहमीच चर्चेचा विषय असतो. फडणवीस यांनीही प्रत्येक दौऱ्यानंतर एवढी गुंतवणूक होणार, तेवढे गुंतवणूकदार कारखाना सुरू करणार हे जाहीर केले आहे, पण अद्याप हे सारे कागदावरच आहे.  फडणवीस यांनी गेल्या जानेवारी महिन्यात डाव्होसचा दौरा केला होता. त्यानंतर पंतप्रधानांसमवेतच जर्मनी भेटीवर गेले होते. एप्रिलच्या अखेरच्या आठवडय़ात मुख्यमंत्री कृषीविषयक प्रदर्शनाकरिता इस्रायलला गेले होते. आता लगेचच चीन भेटीवर गेले आहेत.

नैसर्गिक आपत्तीतही दौरे -अशोक चव्हाण

दुष्काळ, अवकाळी पाऊस तसेच गारपिटीमुळे शेतकरी हवालदिल झाले आहेत. सरकारने घोषणा केल्या असल्या तरी शेतकऱ्यांना अद्यापही मदत मिळालेली नाही. केंद्राकडून राज्याच्या तोंडाला पानेच पुसली गेली आहेत. अशा वेळी आपत्ती निवारणावर लक्ष देण्याऐवजी मुख्यमंत्री फडणवीस यांना परदेश दौऱ्याचे जास्त आकर्षण असल्याचे त्यांच्या अलीकडच्या परदेश दौऱ्यावरून स्पष्ट होते, अशी टीका काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खासदार अशोक चव्हाण यांनी केली आहे.