मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आवाहन

मुंबई : शेती, पाणी, गुंतवणूक, गृहनिर्माण अशा विविध क्षेत्रात महाराष्ट्र देशात अव्वल कामगिरी करत असताना राज्याने आपला पुरोगामित्वाचा वारसा जपणे महत्त्वाचे आहे, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बुधवारी स्वातंत्र्यदिनी मंत्रालयात ध्वजारोहण प्रसंगी केले. जलयुक्त शिवार योजेनच्या माध्यमातून आतापर्यंत १६ हजार गावे जलपरिपूर्ण झाली असून येत्या काही दिवसांमध्ये एकूण २५ हजार गावे जलपरिपूर्ण करणार असल्याचा दावाही त्यांनी यावेळी केला.

भारतीय स्वातंत्र्यदिनानिमित्त बुधवारी मंत्रालयात मुख्यमंत्री  फडणवीस यांच्या हस्ते ध्वजारोहण झाले. त्यावेळी बोलताना मुख्यमंत्र्यांनी हे आवाहन केले. आपले राज्य अनेक क्षेत्रांत अभिमानास्पद कामगिरी करत पुढे जात आहे. स्वच्छ भारत अभियान, स्वच्छ शहरे, राहण्यायोग्य शहरांचा निर्देशांक, परकीय थेट गुंतवणूक आदी वेगवेगळ्या राष्ट्रीय कार्यक्रमात राज्य देशात सातत्याने अग्रेसर कामगिरी करत असल्याचे सांगून मुख्यमंत्री म्हणाले, राज्यावरील दुष्काळाचे सावट दूर करण्यासाठी जलयुक्त शिवार अभियानामध्ये आतापर्यंत १६ हजार गावे जलपरिपूर्ण झाली असून पुढील काळात २५ हजार गावे जलपरिपूर्ण करण्याचे शासनाने निश्चित केले आहे. या लोकसहभागाच्या चळवळीने राज्यात एक अभूतपूर्व क्रांती केल्याचे गौरवोद्गारही त्यांनी काढले.

शेतमालाला योग्य भाव मिळावा यासाठी  केंद्र शासनाने उत्पादन खर्चावर ५० टक्के नफा या सूत्रानुसार विविध पिकांच्या हमीभावात वाढ केली आहे.

तसेच राज्य शासनानेही मोठय़ा प्रमाणावर अन्नधान्याची खरेदी केली आहे. सन १९९९ ते २०१४  या १५ वर्षांच्याोघाडी सरकारच्या कालावधीत करण्यात आलेल्या ४५० कोटी रुपयांच्या अन्नधान्य खरेदीच्या तुलनेत आपल्या सरकारने गेल्या तीन वर्षांत  आठ हजार कोटी रुपयांची अन्नधान्याची विक्रमी खरेदी करून सरकारने शेतकऱ्यांना दिलासा दिल्याचा दावाही त्यांनी केला.

जागतिक बँकेच्या मदतीने दोन महत्त्वाकांक्षी प्रकल्प राज्यात राबविण्यात येत आहेत. विदर्भ आणि मराठवाडय़ासाठी शेतीचे संपूर्ण परिवर्तन करु शकणारा स्वर्गीय नानाजी देशमुख कृषी प्रकल्प सुरू करण्यात आला असून आता कृषी विपणन तसेच मूल्यवर्धनांतर्गत वेगवेगळे प्रकल्प सुरू करण्यात येणार असल्याचेही मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितले.

गेल्या दोन वर्षांत देशात आलेल्या परकीय गुंतवणुकीपैकी ४२ ते ४७ टक्के गुंतवणूक महाराष्ट्रात आली आहे. रोजगारनिर्मितीतही राज्याने अभूतपूर्व कामगिरी केली आहे. संघटित क्षेत्रात आठ लाख इतका सर्वाधिक रोजगारही महाराष्ट्रात निर्माण झाल्याचा दावाही  फडणवीस यांनी केला.

याप्रसंगी महापौर विश्वनाथ महाडेश्वर, आमदार राज पुरोहित, विनायक मेटे, मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती एन. एच. पाटील, मुख्य सचिव डी. के. जैन, पोलीस महासंचालक दत्ता पडसलगीकर, लोकायुक्त  एम. एल. तहलियानी, राज्य निवडणूक आयुक्त जे. एस. सहारिया, माजी पोलीस महासंचालक ज्युलीयस रिबेरो, तिन्ही सैन्य दलाचे प्रमुख अधिकारी, महाराष्ट्र प्रशासकीय न्यायाधिकरणचे अध्यक्ष प्रवीण दीक्षित, मानवाधिकार आयोगाचे अध्यक्ष भगवंतराव मोरे, महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचे अध्यक्ष चंद्रशेखर ओक, अपर मुख्य  सचिव प्रविणसिंह परदेशी, सुनील पोरवाल, बिजय कुमार, श्रीकांत सिंह,  शामलाल गोयल, संजय कुमार, प्रधान सचिव तथा मुख्य राजशिष्टाचार अधिकारी नंद कुमार, विविध मंत्रालयीन विभागांचे  प्रधान सचिव, सचिव आदी उपस्थित होते.

‘सामाजिक सौहार्द टिकविणे आवश्यक’

फुले— शाहू-आंबेडकर यांचा वारसा आपण पुढे  नेत आहोत. राज्याचे पुरोगामित्व अबाधित ठेवण्यासाठी  सर्व समाजघटकांनी प्रयत्नशील राहायला हवे. जात, धर्म आदी कोणत्याही कारणाने भेदभाव होऊ  दिला जाणार नाही. यासाठी सामाजिक सौहार्द टिकून राहणे गरजेचे आहे. सर्वाना सोबत घेऊन आपला महाराष्ट्र पुढे नेऊया, असे आवाहनही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी केले.