राज्य सरकारकडून सर्व स्वातंत्र्य सैनिकांच्या मानधनात वाढ करण्यात आल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जाहीर केले आहे. तसेच आणीबाणीच्या काळात तुरुंगवास भोगलेल्या मिसाबंदींना पेन्शनही सुरु करण्यात आल्याचे मुख्यमंत्र्यांनी ट्विटद्वारे घोषित केले आहे.

ट्विटमध्ये मुख्यमंत्र्यांनी म्हटले की, राज्य सरकारकडून सर्व प्रकारच्या स्वांतत्र्य सैनिकांच्या मासिक मानधनात वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यामध्ये भारतीय स्वातंत्र्याचा लढा, गोवा मुक्ती संग्राम तसेच मराठवाडा मुक्ती संग्राम यांतील सहभागी सैनिक लाभार्थी असतील. या सर्व नायकांना आम्ही सॅल्युट करतो कारण त्यांनीच आम्हाला हे स्वातंत्र्य भेट दिले आहे, अशा शब्दांत मुख्यमंत्र्यांनी त्यांचे आभारही मानले आहेत.

दरम्यान, आणीबाणीच्या काळात मिसा कायद्यांतर्गत तुरुंगवास भोगावा लागलेल्या मिसाबंदींना निवृत्तीवेतनही लागू करण्यात आल्याचे यावेळी मुख्यमंत्र्यांनी जाहीर केले. हे निवृत्ती वेतन केवळ आर्थिक मदत म्हणून नव्हे तर त्यांनी भारतीय लोकशाहीची मुल्ये जतन करण्यासाठी केलेल्या कामाची पावती आहे, त्यामुळे त्यांच्या सन्मानार्थ त्यांना हे वेतन देण्यात येत असल्याचे मुख्यमंत्र्यांनी म्हटले आहे.

या दोन्ही निर्णयांची तत्काळ अंमलबजावणी करण्याचे तसेच सर्व प्रलंबित प्रकरणे वेगाने मार्गी लावण्याचे आदेश आम्ही सर्व जिल्हाधिकाऱ्यांना दिले आहेत, असेही मुख्यमंत्र्यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे.