ठाणे शहराचे नवी मुंबईकडचे प्रवेशद्वार असणाऱ्या विटावा गावातील रहिवाशांना थेट रेल्वे स्थानकात आणून सोडणारा पादचारी पूल अखेर मार्गी लागला आहे. निधीअभावी गेली अनेक वर्षे अध्र्या किलोमिटरपेक्षा जास्त लांबीचा हा पादचारी पूल प्रकल्प कागदावरच होता. या पूलासाठी स्थानिक आमदार आणि राज्याचे वैद्यकीय शिक्षणमंत्री जितेंद्र आव्हाड यांनी केलेल्या पाठपुराव्यानंतर मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी  एमएमआरडीएच्या माध्यमातून पादचारी पूलासाठी २८ कोटी रूपये मंजूर केल़े
ठाणे महापालिकेच्या वतीने हे काम केले जाणार आहे. विटावा येथून कळवा खाडीवरून जाणाऱ्या या पादचारी पुलामुळे प्रवाशांना ठाणे स्थानकात येणे सोयीचे होणार आहे. सध्या त्यांना त्यासाठी कळवा नाक्याचा हेलपाटा मारावा लागतो. शेअर रिक्षा न मिळाल्यास सकाळ-संध्याकाळी अनेक प्रवासी रेल्वे मार्गातून चालत जाण्याचाही धोका पत्करतात. त्यात आतापर्यंत सुमारे २०० प्रवाशांना जीवही गमवावा लागला आहे. या पादचारी पुलामुळे हजारो प्रवाशांना सुरक्षितरित्या कमी वेळेत ठाणे स्थानक गाठता येणार आहे.