कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रात पावसाने हाहाकार माजवला आहे. तर रायगड जिल्ह्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे महाड तालुक्यातील तळई येथे दरड कोसळून याखाली ३२ घरे दबली गेली होती. सकाळी या ठिकाणी मदत व बचाव कार्य सुरू करण्यात आले होते. यात आतापर्यंत ३६ जणांचे मृतदेह बाहेर काढण्यात आले आहेत. तर आणखी ४० जण बेपत्ता असून त्यांचा शोध सुरू आहे. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मंत्रालयात जाऊन पूरस्थितीचा आढावा घेतला. त्यानंतर त्यांनी माध्यम प्रतिनिधींशी संवाद साधला.

दरम्यान मुख्यमंत्र्यांनी मंत्रालयात जाऊन आढावा घेतला, या बातमीनंतर विरोधकांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली आहे. भाजपा आमदार अतुल भातखळकर यांनी मुख्यमंत्र्यांवर तिखट शब्दात टीका केली आहे. अतुल भातखळकर म्हणाले, “मुख्यमंत्री मंत्रालयात, ही बातमी व्हावी इतके वाईट दिवस महाराष्ट्रावर आलेत. हा दिवस उगवण्यासाठी राज्यात शेकडो बळी जावे लागले”

मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचा सावधगिरीचा इशारा

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले “गेल्या चार पाच दिवसांपासून मी आढावा घेत आहे. आपल्याला काही शब्दांची व्याख्या बदलावी लागणार आहे. अतिवृष्टीच्या पलीकडे जाऊन पाऊस होत आहेत. या सगळ्या संकटाला आपण सामोरं जात आहोत. काल पंतप्रधानांचा फोन आला होता. त्यांनी सहकार्याचं वचन दिलं आहे मदतकार्य आणि बचावकार्य सुरु आहे,”

“जीवितहानी होऊ नये हा प्रयत्न असणार आहे. पुरात अडकलेल्यांना वाचवण्यावर व नदी परिसरातील नागरिकांच्या स्थलांतरावर भर देण्यात येत आहेत. डोंगर उतारावरील लोकांनी स्थलांतर करावे”, असे मुख्यमंत्र्यांनी म्हटले आहे.

“धरणं आणि नद्या ओसंडून वाहत आहे. काही ठिकाणी धरणाचं पाणी सोडावं लागत आहे. त्यानुसार नागरिकांना स्थलांतरित करण्याचं काम सुरु आहे. हे सगळं करत असताना करोनाचं संकट टळलेलं नाही. तळई येथे दरड कोसळल्यानंतर काही जणांना वाचवू शकलो. पण आता ३० ते ३५ लोक दुर्देवाने मृत्यूमुखी पडले आहेत. नागपुरातही अतिवृष्टी होत आहे. महाबळेश्वरातही जोरदार पाऊस सुरु असून याआधी कधी पडला नाही तेवढा पाऊस पडत आहे. परदेशातही अशा अतिवृष्टी आणि पुराच्या बातम्या आपण पाहत आहोत. सर्व मिळून संकटाला तोंड देत आहोत,” असं मुख्यमंत्री म्हणाले.

दरड कोसळून ३६ जणांचा मृत्यू , ४० बेपत्ता

रायगड जिल्ह्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे महाड तालुक्यातील तळई येथे दरड कोसळून  याखाली ३२ घरे  दबली गेली होती.,  सकाळी या ठिकाणी मदत व बचाव कार्य सुरू करण्यात आले होते. यात आतापर्यंत ३६ जणांचे मृतदेह बाहेर काढण्यात यश आले आहे, तर आणखी ४० जण बेपत्ता असून त्यांचा शोध सुरू आहे. या दुर्घटनेत तळई येथे ३२ जणांचा तर साखर सुतार येथे चार जणांचे मृतदेह आढळून आले आहेत.