डाव्होसमध्ये भरणाऱ्या जागतिक आर्थिक परिषदेत उपस्थित राहून मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण महाराष्ट्रात गुंतवणूक वाढीसाठी मोठय़ा उद्योगांच्या प्रतिनिधींशी चर्चा करणार आहेत.
डाव्होसमध्ये २२ ते २५ जानेवारी दरम्यान जागतिक आर्थिक परिषदेची (वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम) वार्षिक बैठक होत असून त्याला मुख्यमंत्री चव्हाण उपस्थित राहणार आहेत. व्यापार आणि आर्थिकदृष्टय़ा ही परिषद जागतिक पातळीवर महत्त्वाची मानली जाते. या परिषदेला उपस्थित राहून देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईतील गुंतवणूक आणि अन्य बाबींच्या संदर्भात मते मांडण्यासाठी मुख्यमंत्र्यांना निमंत्रण देण्यात आले आहे. डाव्होसच्या परिषदेसाठी निमंत्रण येणे ही प्रतिष्ठेची बाब मानली जाते. गेले दोन वर्षे निमंत्रण आले तरी मुख्यमंत्र्यांनी उपस्थित राहण्याचे टाळले होते. यंदा मात्र उद्योग विभागाच्या शिष्टमंडळाबरोबर मुख्यमंत्री उपस्थित राहणार आहेत.
महाराष्ट्रात विदेशी गुंतवणुकीला वातावरण पोषक असून, या दृष्टीने राज्याची प्रसिद्धी व्हावी (मार्केटिंग) हा उद्देश असल्याचे सांगण्यात आले. या परिषदेच्या निमित्ताने जागतिक पातळीवरील सर्वच बडय़ा उद्योग समुहांचे प्रतिनिधी येणार आहेत. काही बडय़ा उद्योगांच्या प्रतिनिधींबरोबर मुख्यमंत्री संवाद साधणार आहेत. बडय़ा उद्योगांच्या प्रतिनिधींशी चर्चेसाठी सारे नियोजन करण्यात येत असल्याचेही सांगण्यात आले. गुजरात राज्याने आंतरराष्ट्रीय पातळीवर लॉबिंग सुरू केल्याच्या पाश्र्वभूमीवर आता महाराष्ट्रानेही त्यासाठी पुढाकार घेतला आहे. अन्य कोणत्याही राज्यांपेक्षा गुंतवणुकीसाठी सर्वाधिक पायाभूत सुविधा या महाराष्ट्रात उपलब्ध असल्याकडे राज्याच्या वतीने लक्ष वेधण्यात येणार आहे. यासाठी आकर्षक पुस्तिका राज्य शासनाच्या वतीने तयार करण्यात आली आहे. जागतिक पातळीवरील ३० बडय़ा उद्योग कंपन्यांच्या प्रतिनिधींसाठी राज्य शासनाच्या वतीने २३ तारखेला भोजन आयोजित करण्यात आले आहे.
डाव्होसच्या परिषदेला महाराष्ट्राला निमंत्रण देण्यात येत असले तरी सहा वर्षांंनंतर राज्य शासनाच्या वतीने प्रभावीपणे बाजू मांडली जाणार आहे. २००८ मध्ये तत्कालीन मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांनी राज्याची बाजू मांडली होती. यानंतर पृथ्वीराज चव्हाण गुंतवणूकदारांना आकर्षित करण्याकरिता प्रयत्न करणार आहेत.
नवी मुंबई विमानतळाच्या संदर्भातही मुख्यमंत्री काही जागतिक पातळीवरील कंपन्यांशी चर्चा करणार आहेत. झुरीच आंतरराष्ट्रीय विमानतळ कंपनीने मुख्यमंत्र्यांना तेथील विमानतळाच्या पाहणीसाठी निमंत्रण दिले आहे.