भाजपने पंतप्रधानपदासाठी नरेंद्र मोदी यांची उमेदवारी जाहीर केल्याने राज्यात राज ठाकरे हे युतीबरोबर जातील का, अशी चर्चा सुरू असतानाच राज ठाकरे हे शनिवारी रात्री मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या भेटीला ‘वर्षां’ बंगल्यावर गेल्याने राजकीय वर्तुळात विविध तर्कवितर्क सुरू झाले.
आगामी निवडणुकीत मुंबई, ठाणे, पुणे आणि नाशिक परिसरात राज ठाकरे यांची भूमिका महत्त्वाची राहणार आहे. राज ठाकरे हे भाजप-शिवसेना महायुतीबरोबर गेल्यास त्याचा काँग्रेस-राष्ट्रवादीला नक्कीच फटका बसू शकतो. २००९च्या सार्वत्रिक निवडणुकीतमनसेने युतीच्या मतांवर डल्ला मारल्यानेच आघाडीचा फायदा झाला होता. मुंबई, ठाण्यातील जागा काँग्रेस आघाडीलाजिंकण्यात मनसेची अप्रत्यक्षपणे मदत झाली होती. आगामी निवडणुकीतही हाच कल कायम राहावा, असा काँग्रेस-राष्ट्रवादीच्या नेत्यांचा प्रयत्न आहे. या पाश्र्वभूमीवर मुख्यमंत्री आणि राज ठाकरे यांच्या भेटीला महत्त्व प्राप्त झाले.  टॅक्सीच्या परवान्यांच्या मुद्दय़ावर राज ठाकरे आणि आमदार प्रवीण दरेकर यांनी मुख्यमंत्र्यांना निवेदन सादर केले. त्यानंतर मुख्यमंत्री आणि राज ठाकरे यांची जवळपास पाऊण तास चर्चा झाली. राज ठाकरे हे काही कामानिमित्त भेटण्यासाठी आले होते. या वेळी राजकीयसह विविध विषयांवरही चर्चा झाल्याचे मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी ‘लोकसत्ता’शी बोलताना सांगितले.
मोदी यांच्यामुळे राज ठाकरे हे महायुतीबरोबर जातील, अशी अटकळ व्यक्त केली जात आहे. मात्र दोन ठाकरे बंधू एकत्र येण्याबाबत साशंकताच आहे. मोदी यांच्यामुळे राज ठाकरे हे भाजपच्या उमेदवारांच्या विरोधात लोकसभा निवडणुकीत तेवढी आक्रमक भूमिका घेणार नाहीत, असाही भाजपमध्ये मतप्रवाह आहे. काँग्रेसससाठी मुंबई महत्त्वाची आहे. कारण २००४ आणि २००९ च्या निवडणुकांमध्ये मुंबईने काँग्रेसला साथ दिली. राज ठाकरे यांनी वेगळी चूल मांडली तरच काँग्रेसला आशा आहे. मनसे युतीबरोबर गेल्यास दुरंगी लढतीत काँग्रेसला कितपत यश मिळेल याबाबत साशंकता आहे. यातूनच राज ठाकरे यांची राजकीय वाटचाल कशी असेल याचा अंदाज मुख्यमंत्र्यांनी या भेटीतून घेतल्याचे सांगण्यात येते.