नेत्यांकडूनच केवळ घोषणाबाजी; भाजपची मित्र पक्षांसोबत आज चर्चा

राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार हा मुख्यमंत्र्यांचा अधिकार असला तरी हिवाळी अधिवेशनापूर्वी विस्तार होईल, असे ज्येष्ठ मंत्री चंद्रकांत पाटील यांच्यापाठोपाठ प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी जाहीर केले असले तरी मुख्यमंत्र्यांनी अद्याप काहीच मतप्रदर्शन केलेले नाही. विस्ताराबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे फारसे उत्सुक नसल्याचे पक्षाच्या वर्तुळात बोलले जात आहे.
सरकारचा एक वर्षांचा कालावधी पूर्ण होण्यापूर्वी मंत्रिमंडळाचा विस्तार केला जाईल, अशी घोषणा प्रदेशाध्यक्ष दानवे यांनी केली होती. पण ही घोषणा हवेतच विरली. अधिवेशनापूर्वी विस्तार केला जाईल, असे सहकारमंत्री चंद्रकांत पाटील यांनी जाहीर केले होते. रविवारी दानवे यांनीही विस्ताराची घोषणा केली. दिल्लीने सूचना केली तरच मंत्रिमंडळाचा विस्तार होऊ शकतो, असे भाजपच्या वर्तुळात बोलले जाते. तसेच विस्तार करताना आपल्या मनाप्रमाणे चेहरे निवडण्याची मुख्यमंत्र्यांना मुभा हवी आहे. भाजपमध्ये मंत्रिपदाकरिता मोठय़ा प्रमाणावर स्पर्धा आहे. विस्तार केल्यास अधिवेशनाच्या तोंडावर मंत्रिपदाची संधी न मिळणाऱ्या आमदारांची नाराजी ओढवून घ्यावी लागेल. यापेक्षा विस्तार अधिवेशनानंतरच करावा, असा एकूण मुख्यमंत्र्यांचा सूर असल्याचे समजते. कोणत्याही मंत्र्यांना वगळण्यात येणार नाही हे दानवे यांनी जाहीर केल्याने विद्यमान मंत्र्यांना दिलासा मिळाला आहे.
रिपब्लिकन आणि स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या सदस्यांचा लगेचच मंत्रिमंडळात समावेश केल्यास त्यांना सहा महिन्यांत विधिमंडळात निवडून आणणे शक्य होणार नाही. विधान परिषदेच्या १० जागा जुलै महिन्यात रिक्त होत असल्याने अधिवेशनानंतर विस्तार केल्यास मित्र पक्षाच्या सदस्यांना विधिमंडळावर सहा महिन्यांत निवडून येता येईल.

सहकारी पक्षांचा दबाव
भाजपच्या नेत्यांची उद्या बैठक होत असून, त्यात मंत्रिमंडळ विस्तारावर चर्चा अपेक्षित आहे. याशिवाय शिवसेना, रिपब्लिकन पक्ष, राष्ट्रीय समाज पक्ष, स्वाभिमानी शेतकरी संघटना, शिवसंग्राम या घटक पक्षांच्या नेत्यांना चर्चेसाठी निमंत्रित करण्यात येणार असल्याचे प्रदेशाध्यक्ष दानवे यांनी जाहीर केले. मंत्रिमंडळाचा लवकर विस्तार करा आणि आम्हाला संधी द्या, अशी मित्र पक्षांची मागणी आहे. शिवसेनेला आणखी दोन राज्यमंत्रिपदे दिली जाणार आहेत. भाजपकडील एखादे महत्त्वाचे खाते शिवसेनेला हवे आहे. मुख्यमंत्री व भाजपचे नेते याला अनुकूल नाहीत.