07 April 2020

News Flash

..तर पुढचा मुख्यमंत्री शिवसेनेचाही होणार नाही! मुख्यमंत्र्यांचा टोला

शिवसेना मंत्र्यांच्या कार्यअहवालाचे प्रकाशन उद्धव ठाकरे यांच्या हस्ते गुरुवारी रवींद्र नाटय़मंदिरात झाले

राज्यातील जनतेने एका विश्वासाने भाजप-शिवसेनेला सत्ता दिली आहे. त्या विश्वासाचा, त्यांनी केलेल्या मतदानाचा सन्मान केला पाहिजे. अन्यथा पुढचा मुख्यमंत्री सेनेचाही होऊ शकणार नाही, असा टोला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचे नाव न घेता लगावला.

शिवसेना मंत्र्यांच्या कार्यअहवालाचे प्रकाशन उद्धव ठाकरे यांच्या हस्ते गुरुवारी रवींद्र नाटय़मंदिरात झाले. त्यावेळी उद्धव यांनी मुख्यमंत्र्यांवर तसेच सरकारच्या कारभारावर जोरदार टीका केली. सरकार बदलले तरी कारभार तोच आहे, अशी टीकाही उद्धव यांनी केली. गेले काही दिवस दुष्काळ व शेतकऱ्यांच्या मदतीवरूनही उद्धव यांनी भाजपची कोंडी करण्याचा प्रयत्न चालवला. तसेच पुढचा मुख्यमंत्री शिवसेनेचाच असेल, अशी घोषणाही केली. सातत्याने मुख्यमंत्री, महसूलमंत्री तसेच भाजपवर उद्धव यांच्याकडून होणाऱ्या टीकेसंदर्भात ‘लोकसत्ता’ला दिलेल्या खास मुलाखतीत मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, ‘लोकांनी विश्वासाने भाजप-शिवसेनेला सत्ता दिली, त्याचे भान बाळगून काम करणे आवश्यक आहे. भाजप-सेना युती ही भक्कम आहे. लोकांनी आम्हाला विश्वासाने निवडून दिले. काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडी सरकारच्या भ्रष्ट कारभाराला कंटाळलेल्या जनतेने टाकलेल्या विश्वासाचा शिवसेनेने सन्मान केला पाहिजे. खरे तर आघाडी सरकारच्या भ्रष्टाचारामुळे जे आव्हान युती सरकारपुढे उभे राहिले आहे त्यावर सेनेने तुटून पडणे अपेक्षित असताना कुरघोडीचे राजकारण केले जात आहे ही दुर्दैवी गोष्ट आहे.’
सत्तेत आल्यापासून दुष्काळाचा सामना सुरू आहे. त्यातच अवकाळी पावसाने अडचणी वाढल्या. आघाडी सरकारच्या ढिसाळ कारभाराचाही फटका शेतकऱ्यांना मोठय़ा प्रमाणात बसला असून त्याविरोधात शिवसेनेने आवाज उठवणे आवश्यक आहे. त्याऐवजी कुरघोडीचेच राजकारण केले गेले तर पुढचा मुख्यमंत्री भाजपचाच नव्हे तर शिवसेनेचाही होणार नाही, ही जाणीव सेनेने ठेवावी, असेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

पुढचा मुख्यमंत्री कोणाचा यापेक्षा लोकांचे प्रश्न सोडवणे हाच माझा निर्धार आहे. त्यासाठी सर्वानी काम केले पाहिजे. जे काही चांगले झाले ते आम्ही केले आणि अडचणीची जबाबदारी दुसऱ्याची असे वागणे बरे नव्हे.
– देवेंद्र फडणवीस,
मुख्यमंत्री

जबाबदारीची विभागणी चुकीची
शिवसेनेने काही टीका केली तर त्याला उत्तर म्हणून मुंबई महापालिकेच्या कारभाराचे वाभाडे काढायचे का? आज राज्यात आरोग्य, उद्योग, पर्यावरण आणि परिवहनच्या समस्या उद्भवल्या तर त्याची जबाबदारी शिवसेनेची आणि अन्य खात्यासाठी भाजप जबाबदार अशी विभागणी करणे सर्वस्वी चुकीचे आहे. जनतेचे प्रश्न सोडविण्याचे आव्हान व जबाबदारी ही संबंधित खात्याच्या मंत्र्यांप्रमाणेच मुख्यमंत्री म्हणून माझीही आहे. हे एक टीमवर्क आहे, असे मुख्यमंत्री म्हणाले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 5, 2015 2:34 am

Web Title: cm slam shivsena
Next Stories
1 संसर्गजन्य आजारांचा वाढता ताप!
2 ..तर मुंबईचा बट्टय़ाबोळ निश्चित!
3 गणेशभक्तांच्या कल्पकता आणि पर्यावरणपूरकतेला सलाम
Just Now!
X