News Flash

एकनाथ शिंदेंना विशेष स्थान, परब यांच्यावर विश्वास

मुख्यमंत्री ठाकरे यांचा खातेवाटपातून संदेश

(संग्रहित छायाचित्र)

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शिवसेनेच्या मंत्र्यांकडे खाती सोपवताना एकनाथ शिंदे यांच्याकडे सार्वजनिक बांधकाम (उपक्रम) या पूर्वीच्या खात्याबरोबरच नगरविकास हे महत्त्वाचे खाते देत त्यांचा विशेष मान राखल्याचा संदेश दिला आहे. तर अनिल परब यांच्याकडे परिवहनबरोबरच संसदीय कार्य विभागाची जबाबदारी सोपवत त्यांच्यावरील विश्वास व्यक्त केला आहे. अब्दुल सत्तार व शंभूराजे देसाई यांना कॅबिनेट दर्जा नसला तरी अनुक्रमे महसूल, गृह यासारख्या मोठय़ा खात्यांचे राज्यमंत्रीपद देत त्यांचा सन्मान ठेवण्यात आला.

उद्धव ठाकरे यांनी खात्यांच्या वाटपातून पक्षात योग्य राजकीय संदेश जाईल व कॅबिनेट दर्जा देता न आलेल्या राज्यमंत्र्यांचा योग्य मान राखला जाईल असा प्रयत्न केल्याचे दिसते. आदित्य ठाकरे यांना पर्यावरण व पर्यटन या त्यांच्या आवडीच्या विषयांसह राजशिष्टाचार विभाग देण्यात आला आहे. राजशिष्टाचारमंत्री या नात्याने आदित्य यांच्या रूपात शिवसेनेचा हा नवा चेहरा देशी-परदेशी पाहुणे व यंत्रणेशी संबंध प्रस्थापित करेल.

सुभाष देसाई यांच्याकडे पूर्वीचे उद्योग व खनिकर्म हे खाते कायम ठेवण्यात आले. शिवाय मराठी भाषा हे एक जादा खाते त्यांच्याकडे देण्यात आले. कृषी हे महाराष्ट्राच्या राजकीय-सामाजिक-आíथक धोरणांवर परिणाम करणारे संवदेनशील खाते नाशिकसारख्या कृषीउत्पादनात अग्रेसर असलेल्या जिल्ह्यातून येणारे दादा भुसे यांना देण्यात आले आहे. उदय सामंत यांच्यावर उच्च व तंत्र शिक्षण खात्याची जबाबदारी टाकण्यात आली आहे. वन विभाग पुन्हा विदर्भाकडे गेला असून संजय राठोड यांच्याकडे ती जबाबदारी सोपवण्यात आली आहे.

अनिल परब यांच्याकडे परिवहन खाते व संसदीय कार्यमंत्र्यांची जबाबदारी देण्यात आली आहे. सर्व पक्षांशी समन्वय साधून विधिमंडळ कामकाज सुरळीतपणे पार पाडण्याची मोलाची कामगिरी संसदीय कार्यमंत्र्यांना पार पाडावी लागते. गेल्या २० वर्षांत मुख्यमंत्र्यांनी आपल्या विश्वासू माणसाला ते पद दिल्याचा इतिहास आहे. त्यामुळे अनिल परब यांच्याकडे ते खाते सोपवत ठाकरे यांनी त्यांच्यावरील विश्वास व्यक्त केला आहे. शंकरराव गडाख यांना मृदा व जलसंधारण हा ग्रामीण महाराष्ट्राशी निगडित विभाग देण्यात आला आहे.

देसाई, सत्तार यांनाही महत्त्व

शिवसेनेचे पश्चिम महाराष्ट्रातील ज्येष्ठ आमदार शंभूराजे देसाई व नव्याने सेनेत दाखल झालेले अब्दुल सत्तार यांना कॅबिनेट मंत्रिपदाची अपेक्षा होती. पण समीकरणांमुळे त्यांना राज्यमंत्रीपदच देता आले. शंभूराजे देसाई यांना त्यांच्या अपेक्षेनुसार गृह (ग्रामीण), वित्त, नियोजन, राज्य उत्पादन शुल्क, कौशल्य विकास व उद्योजकता, पणन अशी महत्त्वाची खाती देऊन ते नाराज होणार नाहीत याची काळजी घेण्यात आली.

तर अब्दुल सत्तार यांना महसूल, ग्रामविकास, बंदरे, खार जमिनी विकास, विशेष साहाय्य अशी महत्त्वाची खाती देण्यात आली.

राजीनाम्याची अफवा पसरवली -अब्दुल सत्तार

राज्यमंत्रिपदाचा राजीनामा दिलेला नसताना मी राजीनामा दिल्याची अफवा पक्षातील काही जणांनी पसरवली. त्या लोकांबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे तक्रार केल्याची माहिती महसूल राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांनी दिली आहे.  सत्तार यांनी रविवारी मातोश्रीवर जाऊन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. दोघांमध्ये सुमारे वीस मिनिटे चर्चा झाली. त्यानंतर अब्दुल सत्तार यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधत आपली भूमिका स्पष्ट केली व पक्षातील काही जणांवर नाव न घेता आरोप केला. मी राजीनामा दिलेला नव्हता. माझ्या राजीनाम्याच्या अफवा पसरविल्या गेल्या. पक्षातील आणि पक्षाबाहेरील लोकांनी ते काम केले.

मुख्यमंत्र्यांकडे महत्त्वाची खाती नाहीत

राज्य मंत्रिमंडळात मुख्यमंत्री गृह, नगरविकास सारखी महत्त्वाची खाती स्वत:कडे ठेवतात, अशी परंपरा असली तरी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी महत्त्वाच्या चार-पाच मधील कोणतेच खाते स्वत:कडे ठेवलेले नाही. ठाकरे यांनी स्वत:कडे सामान्य प्रशासन, विधी व न्याय, माहिती जनसंपर्क, माहिती तंत्रज्ञान ही खाती ठेवली आहेत. सरकारी अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे अधिकार असलेले किंवा सरकारचा कारभार चालणारे सामान्य प्रशासन हे खाते मुख्यमंत्री स्वत:कडेच ठेवतात. या वेळीही हे खाते ठाकरे यांच्याकडेच आहे. याशिवाय विधी व न्याय खाते त्यांनी ठेवले. सरकारची प्रतिमा अधोरेखित करण्याकरिता माहिती व जनसंपर्क हे खाते महत्त्वाचे असते. हे खातेही ठाकरे यांच्याकडेच असेल. गृह, नगरविकास, महसूलसारखी पहिल्या पाचांमधील खाती टाळून कामाचा अधिक बोजा पडणार नाही याची खबरदारी घेतली आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 6, 2020 12:44 am

Web Title: cm special respect for eknath shinde belief in parab abn 97
Next Stories
1 उच्च शिक्षणमंत्री पुन्हा ज्ञानेश्वर विद्यापीठाचेच
2 औषधनिर्माणशास्त्र पदविकेनंतर मान्यताप्राप्त औषधविक्री दुकानातून प्रशिक्षण बंधनकारक
3 कांद्याचे दर घसरल्याने निर्यातीस परवानगीची मागणी
Just Now!
X