अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे नियोजित अध्यक्ष डॉ. श्रीपाल सबनीस यांच्या माफीनाम्यानंतरही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे संमेलनास जाण्यासाठी तयार नसल्याचे समजते. संमेलन हे केवळ अध्यक्षांचे नसते, तर ते साहित्य रसिकांचे असते आणि सबनीस यांनी चूक केली, तरी मुख्यमंत्र्यांनीही अनुपस्थित राहून आपली नाराजी दाखवावी का, असा विचार मुख्यमंत्री फडणवीस करीत आहेत. अनुपस्थित राहिल्यास साहित्य वर्तुळात त्याची कोणती प्रतिक्रिया उमटेल, याचा अंदाज सध्या ते घेत आहेत.

सबनीस यांनी  पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविषयी विनाकारण वक्तव्ये केल्याने गेले काही दिवस वाद निर्माण झाला आहे. भाजपमध्ये त्याची तीव्र प्रतिक्रिया उमटली व सबनीस यांच्यावर टीका करण्यात आली. सबनीस अध्यक्षपदी असलेल्या संमेलनास मुख्यमंत्र्यांनी जाऊ नये, असा भाजप नेत्यांचा आग्रह आहे.

सबनीस यांच्यावर मुख्यमंत्री अजूनही नाराज असून संमेलनास अनुपस्थित राहून ती दाखवावी, असे त्यांनाही वाटत आहे.

मुख्यमंत्री न आल्यास संमेलनातील रसिकांच्या उत्साहावर विरजण पडेल आणि कार्यक्रमाला गालबोट लागेल. मात्र, संमेलनास हजर रहावे किंवा नाही, याबाबत अजून मुख्यमंत्र्यांनी अंतिम निर्णय घेतला नसल्याचे उच्चपदस्थ सूत्रांनी ‘लोकसत्ता’ ला सांगितले.

ही कसली दिलगिरी?

ही कसली दिलगिरी, असा सवाल भाजप प्रवक्ते माधव भांडारी यांनी डॉ. सबनीस यांच्या दिलगिरीवरुन केला आहे. पंतप्रधान मोदी आणि मुख्यमंत्री फडणवीस यांना त्यांनी पाठविलेल्या पत्रातील भाषा पाहता ती दिलगिरीची वाटत नाही, असे भांडारी यांनी स्पष्ट केले.