देशभरातील वाढत्या महिला अत्याचारांच्या पार्श्वभूमीवर राज्यातील महिलांच्या सुरक्षेच्या दृष्टीने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी देखील उपाययोजना करण्यास सुरूवात केल्याचे दिसत आहे. मुख्यमंत्री ठाकरे यांनी आज या संदर्भात वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांची महत्वपूर्ण बैठक बोलावली होती.

मुख्यमंत्री ठाकरे यांनी या बैठकीस उपस्थित असलेल्या सर्व वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांना, महिलांवरील अत्याचार व अन्य संबधित प्रकरणांवर तातडीने कारवाई केली जावी, असे आदेश दिले आहेत.

देशातील वाढत्या महिला अत्याचारांविरोधात आता ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते अण्णा हजारे यांनी देखील आवाज उठवला आहे. निर्भया प्रकरणातील पीडितेला लवकरात लवकर न्याय मिळवून द्यावा, अशी विनंती त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्राद्वारे केली आहे.

तर या अगोदर पंतप्रधान मोदी यांनी पुणे येथे राष्ट्रीय सुरक्षा परिषदेच्या समारोपप्रसंगी देशभरातील पोलीस महासंचालकांना, महिलांवरील अत्याचाराच्या घटना रोखण्यासाठी पोलिसांनी डोळ्यात तेल घालून काम करावे. महिलांसाठी सुरक्षित वातावरण निर्माण करण्यासाठी पोलिसांनी प्रभावीपणे काम केले पाहिजे. महिलांच्या तक्रारींकडे काणाडोळा करता कामा नये, अशा सूचना केल्या होत्या. पोलिसांवरील कामाचा ताण वाढत आहे. अशा परिस्थितीत काम करताना पोलिसांनी समाजातील शेवटचा घटक विचारात ठेवून कर्तव्य पार पाडावे, असेही पंतप्रधान म्हणाले होते.