चित्रपट आणि मालिकांचे चित्रीकरण करोनाविषयक आरोग्याच्या नियमांची पूर्ण काळजी घेऊन झाले पाहिजे. यात कोणताही निष्काळजीपणा झालेला परवडणार नाही असे सांगून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी विशेषत: मुंबई आणि परिसरात निर्मात्यांनी चित्रीकरणाचे स्थळ व वेळ याबाबत पोलिसांशी योग्य तो समन्वय ठेवावा आणि आपल्या पथकातील कलाकार व लोकांची नियमित करोना तपासणी करावी, लसीकरण होईल हे पाहावे अशा सूचना दिल्या.

हिंदी चित्रपट निर्मात्यांची सर्वात मोठी संघटना असलेल्या प्रोड्युसर्स गिल्डच्या पदाधिकाऱ्यांशी मुख्यमंत्र्यांनी आज दूरदृश्य प्रणालीद्वारे संवाद साधला. यावेळी या पदाधिकाऱ्यांनी राज्य शासनाच्या कोविडविषयक निर्देशांचे पुरेपूर पालन करून चित्रीकरण पार पडले जाईल अशी ग्वाही या संघटनेने दिली.
या बैठकीस प्रोड्युसर गिल्डचे रितेश सिधवानी, स्तुती रामचंद्र, मधु भोजवानी, राकेश मेहरा, नितीन आहुजा हे सहभागी झाले होते. त्याचप्रमाणे सुबोध भावे, नागराज मंजुळे, रवी जाधव यांनीही बैठकीत सहभागी होऊन सूचना केल्या. आदेश बांदेकर यांनी बैठकीचे सूत्रसंचलन केले.

हेही वाचा – गोष्ट मुंबईची Video : पारशींचा सहभाग असलेल्या मुंबईतल्या दंगली

गेल्या काही महिन्यांपासून हिंदी व मराठी चित्रपट आणि मालिकांचे निर्माते कोरोना काळात नियमांचे पालन करून चित्रीकरण करीत आहेत परंतु चित्रीकरणाच्या वेळेत वाढ करणे गरजेचे आहे. सायंकाळी ४ नंतर देखील चित्रीकरण करण्यास परवानगी मिळाल्यास सर्वतोपरी काळजी घेऊन व नियमांचे पालन करून चित्रीकरण करता येणे शक्य आहे असे प्रोड्युसर गिल्डचे म्हणणे होते.

मुंबई आणि महाराष्ट्रातील चित्रपट निर्मात्यांनी कोविड संदर्भात आपल्या कलाकार व कर्मचाऱ्यांची विशिष्ट दिवसानंतर कोरोना चाचणी करीत राहणे, पथकातील कुणाला ताप जरी आला असेल किंवा काही लक्षणे दिसत असतील तर त्वरित दखल घेणे आणि सर्वात महत्वाचे म्हणजे सर्वांचे दोन्ही डोसेससह लसीकरण असणे गरजेचे आहे, असे निर्देश मुख्यमंत्र्यांनी दिले.

मुंबई पोलिसांनी देखील प्रत्येक निर्मात्यांचे चित्रीकरणाचे वेळापत्रक , चित्रीकरण ठिकाण व वेळा याबाबतची माहिती निर्मात्यांकडून मागवून घ्यावी आणि एखाद्या अधिकाऱ्यावर समन्वयाची जबाबदारी टाकून व्यवस्थित व नियमांची काळजी घेत असल्याची खात्री करून परवानगी द्यावी असे निर्देश मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिले.