गेल्या दीड वर्षापासून राज्यात महाविकासआघाडीचं सरकार सत्तेत आहे. मात्र, या काळात विरोधकांकडून सातत्याने सरकारवर निशाणा साधला गेला. भाजपाच्या नेतेमंडळींकडून वारंवार सरकार कधी पडणार याचे मुहूर्त देखील सांगितले जात होतं. तीन वेगवेगळ्या विचारसरणीचे पक्ष एकत्र आल्यामुळे सरकार फार काळ टिकणार नाही, अशी अटकळ बांधली जात होती. यासंदर्भात आता खुद्द शिवसेना पक्षप्रमुख आणि राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी भूमिका मांडली आहे. उद्धव ठाकरे यांनी या मुद्द्यावर ‘लोकसत्ता’च्या ‘दृष्टी आणि कोन’ या दूरसंवादमालेमध्ये भाष्य केलं. लोकसत्ताचे संपादक गिरीश कुबेर यांनी यासंदर्भात प्रश्न विचारल्यावर उद्धव ठाकरे यांनी त्यासंदर्भात सविस्तर भूमिका स्पष्ट केली.

ती एक अकल्पित घटना होती!

दरम्यान, यावेळी बोलताना उद्धव ठाकरे यांनी राज्यात या तीन पक्षांनी एकत्र येऊन सरकार स्थापन करणं ही एक अकल्पित घटना होती असा उल्लेख केला. “तीन पक्षांचं सरकार कधी येऊ शकेल, हा माझ्याही मनात विचार नव्हता. अकल्पित असं घडलं किंवा घडवावं लागलं. यानंतर दुसरं अकल्पिक घडलं ते करोनाचं. त्यामुळे मंत्रिमंडळाच्या निमित्ताने आम्ही एकमेकांना भेटतो. पण तळागाळातल्या कार्यकर्त्यांपर्यंत आम्ही करोनामुळे प्रत्यक्ष भेटीसाठी पोहोचू शकलेलो नाही. ऑनलाईन पद्धतीनेच कार्यकर्त्यांच्या बैठका होत आहेत”, असं ते म्हणाले.

आपण कुणीही भविष्यवेत्ते नाही!

राज्यात सध्या सत्तेत असलेली महाविकासआघाडी किती काळ एकत्र राहील? या प्रश्नावर उद्धव ठाकरे यांनी उत्तर दिलं. “युती किंवा आघाडी चांगल्या कामासाठी असेल, कामं होत असतील तर ती का टिकू नये? आपण कुणीही भविष्यवेत्ते नाही. पण काम करण्याची जिद्द असेल, तर पुढच्या कित्येक वर्षांसाठी जशी काम होईल तशी आघाडी टिकवू शकतो. जशी युती टिकली, तशीच आघाडीही टिकेल. जोपर्यंत आमच्या तिघांच्या मनातला हेतू स्वच्छ आणि प्रामाणिक असेल, तोपर्यंत आघाडी टिकायला काय हरकत आहे? आमच्यात कुरबुरी असत्या, तर सरकार वर्ष-दीड वर्ष चाललंच नसतं. सरकार सुरू झालं, तेव्हा सरकार म्हणून सर्वात नवखा मुख्यमंत्रीच होता. या सर्व लोकांचं मला सहकार्य लाभतंय”, असं ते म्हणाले.

‘अनलॉक’च्या निर्णयावर गोंधळ का झाला?; मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी स्पष्ट केली भूमिका

आमची युतीबाहेर पडण्याची इच्छा नव्हती!

दरम्यान, भाजपासोबतची तुटलेली युतीसंदर्भात देखील मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी यावेळी भूमिका मांडली. “आम्ही जे काही केलं ते प्रामाणिकपणे केलं. भाजपासोबत देखील आमची युती २५ ते ३० वर्ष होती. तोंडदेखलं काही असेल तर ते योग्य नाही. आम्ही एका ध्येयाने एकत्र राहिलो. आमची युतीमधून बाहेर पडण्याची इच्छा नव्हती”, असं ते म्हणाले. “प्रमोद महाजन, गोपीनाथ मुंडे यांच्याशी आमचे कौटुंबिक नातेसंबंध होते. पंतप्रधानांशी देखील जे आमचे वैयक्तिक नातेसंबंध आहेत, ते लपवण्याचं कारण काय? राजकारण राजकारणाच्या ठिकाणी ठेवावं. वैयक्तिक संबंध वेगळे ठेवावेत”, असं देखील उद्धव ठाकरे यावेळी म्हणाले.