News Flash

“…तोपर्यंत शिक्षकांना लोकल प्रवासाची परवानगी नाही”, मुख्यमंत्र्यांचा निर्णय!

मुंबईत शिक्षकांनी लोकलमधून प्रवासाची परवानगी मागितली असताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी ही परवानगी देण्यास नकार दिला आहे.

मुंबई लोकल ट्रेन (संग्रहीत छायाचित्र)

गेल्या काही दिवसांपासून मुंबईत शिक्षकांकडून लोकल प्रवासाची परवानगी मिळण्याची मागणी केली जात आहे. यासाठी दोन दिवसांपूर्वी मुंबईत दहावीच्या शिक्षकांनी आंदोलन देखील केलं होतं. दहावीच्या विद्यार्थ्यांचं अंतर्गत मूल्यमापन करण्यासाठी शिक्षकांना शाळेत जावं लागतं. त्यासाठी राज्य सरकारने शिक्षकांना लोकल प्रवासाची परवानगी द्यावी, अशी मागणी करण्यात आली होती. मात्र, अखेर ही मागणी राज्य सरकारनं फेटाळून लावली आहे. खुद्द मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी यासंदर्भातला निर्णय घेतला असून त्यामुळे या शिक्षकांपुढचा प्रवासासंदर्भातला पेच कायम राहिला आहे.

राज्यात टप्प्याटप्प्याने अनलॉकची प्रक्रिया सुरू करण्यात आली असून पॉझिटिव्हिटी रेट आणि ऑक्सिजन बेड ऑक्युपन्सीच्या आधारावर संबंधित जिल्हा किंवा महानगर पालिकेचा कोणत्या गटात समावेश होईल, हे ठरवलं जात आहे. मात्र, गेल्या आठवड्यात मुंबईतील पॉझिटिव्हिटी रेट आणि ऑक्सिजन बेड ऑक्युपन्सी कमी होऊन देखील मुंबईत तिसऱ्या गटाचेच निर्बंध लागू ठेवण्याचा निर्णय मुंबई महानगर पालिकेकडून घेण्यात आला आहे. त्यामुळे मुबईकरांना निर्बंधांमधून सूट मिळण्यासाठी अजून वाट पाहावी लागणार आहे.

मुंबई दुसऱ्या गटात येईपर्यंत दिलासा नाहीच!

दरम्यान, पहिल्या आणि दुसऱ्या गटामध्ये लोकल प्रवासाचा समावेश आहे. मात्र मुंबईत अजूनही तिसऱ्या गटाचे निर्बंध लागू आहेत. या पार्श्वभूमीवर जोपर्यंत मुंबईचा समावेश दुसऱ्या गटात होत नाही, तोपर्यंत शिक्षकांना लोकलमधून प्रवास करण्याची परवानगी देता येणार नाही. शिक्षण विभागाने शिक्षकांसाठी पर्यायी व्यवस्था करावी, असा निर्णय मुख्यमंत्र्यांनी घेतला आहे. या पार्श्वभूमीवर दहावीच्या विद्यार्थ्यांच्या गुणांचं मूल्यमापन करण्यासाठी शाळांमध्ये कसं पोहोचणार? हा प्रश्न शिक्षकांना पडला आहे.

अनलॉकच्या पहिल्या आठवड्यानंतर अशी आहे जिल्हानिहाय आकडेवारी!

कसं आहे ५ टप्प्यांत वर्गीकरण?

गेल्या आठवड्यात ४ जून रोजी राज्य सरकारने राज्यात टप्प्याटप्प्याने अनलॉक करण्याची प्रक्रिया सुरू केली. या प्रक्रियेमध्ये राज्यातील सर्व जिल्ह्यांचं वर्गीकरण ५ गटांमध्ये करण्यात आलं. पहिल्या गटापासून पाचव्या गटापर्यंत निर्बंध कठोर होत जातात. यामध्ये मुंबईचा समावेश सुरुवातील तिसऱ्या गटामध्ये करण्यात आला. पॉझिटिव्हिटी रेट आणि ऑक्सिजन बेड ऑक्युपन्सी घटल्यास मुंबईचं दुसऱ्या किंवा पहिल्या गटामध्ये देखील वर्गीकरण होण्याची शक्यता होती. मात्र, गेल्या आठवड्याभरात शिस्तीचं पालन करून पॉझिटिव्हिटी रेट ५ टक्क्यांच्या खाली आणून देखील मुंबईत तिसऱ्याच टप्प्याचे निर्बंध लागू राहणार आहेत. मुंबई पालिकेकडून यासंदर्भातला निर्णय जाहीर करण्यात आला आहे.

मुंबई तिसऱ्या टप्प्यातच का? वाचा सविस्तर

मुंबई महानगर पालिकेने घेतलेल्या निर्णयानुसार, मुंबई शहराची भौकोलिक रचना, लोकसंख्येच्या घनतेचं प्रमाण, लोकलमधून दाटीवाटीने मुंबई शहरात मोठ्या संख्येनं दररोज येणारे प्रवासी आणि भारतीय हवामान खात्याने मुंबई शहरात येत्या काही दिवसांत दिलला अतिवृष्टीचा इशारा या पार्श्वभूमीवर मुंबईत तिसऱ्या टप्प्याचे सध्या अस्तित्वात असलेले निर्बंधच कायम राहणार आहेत. सरकारी आदेशांप्रमाणए सर्व व्यापारी आस्थापनांना सोशल डिस्टन्सिंग, मास्कचा वापर आणि इतर उपाययोजना अनिवार्य राहतील.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 16, 2021 7:16 pm

Web Title: cm uddhav thackeray rejects mumbai local travel permission to school teachers pmw 88
Next Stories
1 “शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची शिवसेना कुठे आणि आज महिलांवर हात उगारणारी शिवसेना कुठे?”
2 “…शिवसेनेने आज आपली औरंगजेबी वृत्ती दाखवली”; आशिष शेलार यांचा घणाघात!
3 “भाजपाची अवस्था जलबिन मछलीसारखी झालीये”, मुंबईचे पालकमंत्री अस्लम शेख यांची टीका!
Just Now!
X