कृषी कायद्यांसह महत्त्वाच्या विषयांवर चर्चा

मुंबई : केंद्राने मंजूर के लेल्या कृषी कायद्याची राज्यात अंमलबजावणी करू नये, असा मतप्रवाह सत्ताधाऱ्यांमध्ये असल्याच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांच्यात रविवारी चर्चा झाली. कृषी कायद्याच्या अंमलबजावणीला काँग्रेसने तीव्र विरोध दर्शवला आहे.

ठाकरे, पवार आणि थोरात यांच्यात राज्याच्या संदर्भातील महत्वाच्या विषयांवर सविस्तर चर्चा झाली. केंद्राने नुकत्याच मंजूर के लेल्या कृषी कायद्याची राज्यात अंमलबजावणी करू नये, अशी मागणी काँग्रेसने के ली आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीही कायद्याच्या अंमलबजावणीबाबत विरोधी भूमिका मांडली होती. कृषी कायद्याची अंमलबजावणी राज्यात करू नये, अशी काँग्रेसची स्पष्ट भूमिका असून, यावर पक्षाची भूमिका मुख्यमंत्री ठाकरे व पवारांकडे मांडल्याचे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी सांगितले. कृषी कायद्याला शिवसेना व राष्ट्रवादीचाही विरोध असल्याचे थोरात म्हणाले.

कृषी कायद्याची अंमलबजावणी व राज्यासमोरील महत्वाचे प्रश्न यावर या बैठकीत चर्चा करण्यात आली. काही महत्वाचे प्रश्न सोडविण्याबाबत चर्चा झाली. तीन पक्षांचे सरकार असल्याने अशी चर्चा होतच असते. त्यात नवीन असे काहीच नाही, असेही थोरात यांनी सांगितले. देवेंद्र फडणवीस व संजय राऊत यांच्या भेटीला विनाकारण महत्व दिले जात असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.