एकीकडे राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनादरम्यान मनसुख हिरेन प्रकरणी नाव येत असलेले पोलीस अधिकारी सचिन वाझे यांच्या बदलीचे आदेश निघाले असताना विरोधकांनी मात्र त्यांच्यावर कारवाई करण्याची मागणी लावून धरली आहे. या पार्श्वभूमीवर राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी विरोधकांना सुनावलं आहे. अधिवेशन संपल्यानंतर उद्धव ठाकरे यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासोबत घेतलेल्या संयुक्त पत्रकार परिषदेमध्ये या एकूण प्रकरणावर आपली भूमिका स्पष्ट केली आहे. “आधी फाशी आणि नंतर तपास अशा प्रकारची मागणी होत असून ते होणार नाही”, असं मुख्यमंत्री म्हणाले आहेत.

“…जणूकाही सचिन वाझे बिन लादेनच आहेत!”

यावर आपली भूमिका स्पष्ट करताना उद्धव ठाकरे म्हणाले, “यासंदर्भातला तपास सुरू आहे. त्यात जो कुणी दोषी सापडेल त्याच्यावर सरकार कारवाई करणार आहे. सचिन वाझे जणूकाही ओसामा बिन लादेन आहेत असं जे चित्र निर्माण केलं जातंय, ते चुकीचं आहे. तपासानंतर जो कुणी दोषी आढळेल, त्याच्यावर कारवाई होणारच आहे. सचिन वाझे पूर्वी शिवसेनेत होते. त्यानंतर त्यांचा कधीही शिवसेनेशी संबंध आलेला नाही. डेलकरांच्या बाबतीत तर तिथले स्थानिक पदाधिकारी भाजपाच्या कार्यकाळात मंत्री होते. सचिन वाझे काही आमचे मंत्री नव्हते”, असं म्हणत मुख्यमंत्र्यांनी भाजपावर निशाणा साधला आहे.

“कुणीही तपासाला दिशा देऊ नये”

“मोहन डेलकर यांनी आत्महत्या केली आहे. त्याआधी त्यांनी सुसाईड नोट लिहिली. त्यात काही जणांची नावं आहे. आता तपास सुरू झाला आहे. जिलेटिन कांड्यांचा देखील तपास सुरू झाला आहे. आधी फाशी द्या आणि नंतर तपास करा ही पद्धत होणार नाही. तपासाला दिशा देण्याचं काम कुणी करू नये. सरकार त्यांनी देखील यापूर्वी चालवलं आहे. त्यांना हे माहिती आहे”, असं म्हणत मुख्यमंत्र्यांनी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना देखील सुनावले आहे.