मुंबई : जागतिक नकाशावरील अत्यंत महत्त्वाचे शहर असलेल्या मुंबईचा विकास म्हणजे केवळ कॉँक्रीटीकरण नव्हे तर, येथील नागरिकांना उत्तम सेवासुविधा आणि शहराच्या सौंदर्यीकरणाकडेही लक्ष दिले पाहिजे, अशा शब्दांत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शुक्रवारी पालिका अधिकाऱ्यांना त्यांच्या जबाबदारीची जाणीव करून दिली.

मुंबई महानगरपालिकेच्या स्वच्छ मुंबई, सुंदर मुंबई या उपक्रमांतर्गत राबविण्यात येत असलेल्या उपाययोजनांसंदर्भात सह्य़ाद्री अतिथिगृहावर मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली महापालिकेचे साहाय्यक आयुक्त व इतर अधिकाऱ्यांची आढावा बैठक पार पडली. त्या वेळी बोलताना मुख्यमंत्री म्हणाले की, मुंबईसारख्या महानगराचे केवळ काँक्रीटीकरण होऊ नये, तर त्याच्या सौंदर्यीकरणाकडेही लक्ष दिले पाहिजे. मुंबईतील रस्ते, पदपथ, वाहतूक  बेटे, उद्याने, मनोरंजन मैदाने, मंडई, शालेय परिसर, आरोग्य, पाणी आदी विविध नागरी सेवा-सुविधा जागतिक  दर्जाच्या करण्यासाठी सर्वानी संघटितपणे काम केले पाहिजे, असे आवाहन त्यांनी केले.

शहरामध्ये जागोजागी डेब्रिज, कचरा टाकणाऱ्यांविरुद्धही कारवाई करावी. मुंबई डेब्रिजमुक्त व कचरामुक्त करण्यासाठी कालमर्यादा ठरविण्यात यावी. तसेच वाहतूक बेटांचे सुशोभीकरण करणे, पदपाथ सुव्यवस्थित राखणे, स्थानिक  व वातावरणात टिकणारी व फुलणारी झाडे लावणे इत्यादी कामांना प्राधान्य द्यावे. चांगले काम करणाऱ्या साहाय्यक आयुक्तांचा सत्कार करण्यात येईल, असे त्यांनी जाहीर केले.

मुंबईतील रस्ते, पदपथ याबरोबरच उड्डाणपुलाखालील जुनी वाहने काढून टाकण्याच्या सूचना मुख्यमंत्र्यांनी दिल्या. मुंबईत या वर्षी पाणी साचणार नाही, यासाठी नाले, पदपथ, गटारे यांची स्वच्छता करण्याचे निर्देशही त्यांनी अधिकाऱ्यांना दिले. मुंबईतील पदपथ सुंदर करण्यासाठी आयोजित प्रदर्शनास त्यांनी या वेळी भेट दिली.

या वेळी नगरविकासमंत्री एकानाथ शिंदे, आमदार आदित्य ठाकरे, अनिल परब, मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव विकास खारगे, महानगरपालिका आयुक्त प्रवीण परदेशी, पोलीस आयुक्त संजय बर्वे, मुंबई प्रदेश विकास प्राधिकरणाचे महानगर आयुक्त आर. ए. राजीव, नगर विकास विभागाचे अपर मुख्य सचिव डॉ. नितीन करीर, प्रधान सचिव मनीषा म्हैसकर, म्हाडाचे मुख्य कार्यकारी अधिकारी मिलिंद म्हैसकर आदी वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

अवैध फलकांवर कारवाई करा..

मुंबईत हवा प्रदूषणाबरोबरच दृश्यमानताही कमी होत आहे. यावर उपाय योजण्याची आवश्यकता आहे. त्यासाठी महानगरपालिकेने जाहिरात फलक  धोरण आखावे. तसेच अवैध व विनापरवाने फलक  लावून शहराचे सौंदर्य बिघडविणाऱ्यांविरुद्ध कडक कायदेशीर कारवाई करावी, असे आदेश मुख्यमंत्र्यांनी अधिकाऱ्यांना दिले. अवैध फलकांना आळा घालण्यासाठी सर्वच राजकीय पक्षांशी आपण स्वत: संवाद साधणार आहे, असे त्यांनी सांगितले.