महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज करोना लसीचा दुसरा डोस घेतला. मुंबईमधील जे. जे. रुग्णालयात उद्धव ठाकरेंनी करोना लसीचा दुसरा डोस घेतला. यासंदर्भातील माहिती मुख्यमंत्री कार्यालयाच्या अधिकृत ट्विटर हॅण्डलवरुन देण्यात आली आहे. दुपारी बाराच्या सुमारास उद्धव ठाकरे यांनी करोना लसीचा दुसरा डोस घेण्यासाठी जे. जे. रुग्णालयाच्या परिसरामध्ये दाखल झाले होते.
११ मार्च रोजी उद्धव यांनी करोना लसीचा पहिला डोस घेतला होता. त्यानंतर बरोबर २८ दिवसांनी त्यांनी आज लसीचा दुसरा डोस घेतला. मुख्यमंत्र्यांनी कोव्हिशिल्ड या लसीचे डोस घेतले आहेत. उद्धव ठाकरे यांच्या पत्नी रश्मी ठाकरे तसेच पुत्र आणि महाराष्ट्र राज्याचे पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे यांना करोनाची बाधा झाली आहे. आदित्य हे होम क्वारंटाइन असून रश्मी ठाकरेंवर रुग्णालयामध्ये उपचार सुरु आहेत. ‘लसीबद्दल मनामध्ये भिती आणि संभ्रम ठेऊ नका. मनात कोणतीही शंका न ठेवता लस टोचून घ्या,’ असं आवाहन उद्धव यांनी लसीचा पहिला डोस घेतल्यानंतर केलं होतं.
मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी आज कोविड लसीचा दुसरा डोस घेतला.
CM Uddhav Balasaheb Thackeray took his second dose of COVID vaccine today.#BreakTheChain pic.twitter.com/umpIaxGMlk
— CMO Maharashtra (@CMOMaharashtra) April 8, 2021
मोदींनीही आजच घेतला दुसरा डोस
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी करोना लसीचा दुसरा डोस घेतला आहे. करोना लसीचा दुसरा डोस घेण्यासाठी नरेंद्र मोदी सकाळीच एम्स रुग्णालयात पोहोचले होते. मोदींनी ट्विट करत यासंबंधी माहिती दिली आहे. याआधी १ मार्चला मोदींनी लसीचा पहिला डोस घेतला होता. मोदीनी घेतलेल्या दोन डोसदरम्यान ३७ दिवसांचं अंतर आहे. लसीकरणाला लोकांचा प्रतिसाद मिळत नसतानाच मोदींनी लस घेतल्याने लसीकरणाच्या टक्केवारीत चांगलीच वाढ झालेली पहायला मिळाली होती. करोनाला हरवण्यासाठी लसीकरण हा एक मार्ग असल्याचं यावेळी मोदी म्हणाले आहेत.
लसीकरणाचा चौथा टप्पा सुरु…
देशात लसीकरणाचा पहिला टप्पा १६ जानेवारी रोजी सुरू झाला होता. पहिल्या टप्प्यात आघाडीवरील करोनायोद्धय़ांच्या लसीकरणासाठी सीरम संस्थेने उत्पादित केलेली ‘ऑक्सफर्ड’ची ‘कोव्हिशिल्ड’ आणि भारत बायोटेक कंपनीची ‘कोव्हॅक्सिन’ या दोन लशींचा वापर करण्यासाठी परवानगी देण्यात आली आहे. देशामध्ये १ मार्चपासून करोना लसीकरणाचा तिसरा टप्पा सुरु झाला. या तिसऱ्या टप्प्याअंतर्गत वय वर्षे ६० तसेच ४५ वर्षे पूर्ण ते ६० वर्षांपर्यंत वय असणाऱ्या व सह-व्याधी (कोमॉर्बिड) असणाऱ्या व्यक्तींचेही लसीकरण करण्यास सुरुवात झाली. चौथ्या टप्प्यामध्ये एक एप्रिलपासून ४५ वर्षांवरील सर्वांचं लसीकरण करण्यास परवानगी देण्यात आली आहे. भारतामध्ये आठ कोटींहून अधिक जणांचं अत्तापर्यंत लसीकरण करण्यात आलं आहे.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on April 8, 2021 12:40 pm