देशात पाच ऐतिहासिक स्थळांचा ‘आयकॉनिक साईट’ म्हणून पुनर्विकास करण्याचा संकल्प अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी केला आहे. पण सांस्कृतिकदृष्टीने संपन्न असलेल्या महाराष्ट्राच्या कोणत्याही स्थळाचा उल्लेख त्यात नाही. महाराष्ट्राबाबतचा हा दुजाभाव ठळकपणे या अर्थसंकल्पातून दिसून आला. गुजरातमधील आंतरराष्ट्रीय वित्तीय केंद्राला अधिक बळकटी देताना मुंबईसारख्या देशाच्या विकासात सर्वाधिक योगदान देणाऱ्या शहराकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केल्याचेही दिसून येते याची खंत मुंबईकर आणि महाराष्ट्राला नेहमी राहील अशी प्रतिक्रिया मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केली आहे.

या अर्थसंकल्पाने देशाच्या विकासाचे इंजिन असलेल्या मुंबई आणि महाराष्ट्रावर पूर्ण अन्याय केला आहे. मुंबईतील पायाभूत सुविधांच्या विकासाला, मेट्रोला अपेक्षित असलेले अर्थबळ या अर्थसंकल्पातून दिले गेल्याचे दिसून येत नाही. उपनगरीय सेवा ही मुंबईकरांची जीवनरेखा आहे, तिचा आणि प्रस्तावित रेल्वे मार्गाच्या विकासाचा कुठलाही उल्लेख अर्थसंकल्पात नाही. दिल्ली-मुंबई द्रुतगती मार्ग आणि मुंबई अहमदाबाद बुलेट ट्रेनच्या जुन्याच उल्लेखांशिवाय या अर्थसंकल्पाने राज्यातील रेल्वे विकासाला कोणतीही गती दिलेली दिसत नाही अशी टीका त्यांनी केली आहे.