मातोश्रीचं टेन्शन पुन्हा काहीसं वाढलं आहे. कारण आता तेजस ठाकरेंच्या दोन सुरक्षा रक्षकांना करोनाची लागण झाली आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे लहान चिरंजीव तेजस ठाकरे यांच्या दोन सुरक्षा रक्षकांना करोनाची लागण झाली आहे. त्यामुळे तेजस ठाकरेंसह इतर सुरक्षा रक्षकांची तातडीने करोना चाचणी करण्यात आली आहे. तेजस ठाकरे यांना वाय प्लस सुरक्षा आहे. त्यांच्या ताफ्यातील दोन सुरक्षा रक्षकांना करोनाची लागण झाल्यानंतर इतर सुरक्षा रक्षकांची तातडीने चाचणी करण्यात आली आहे.

काही दिवसांपूर्वीच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या वांद्रे कलानगर येथील भागात असलेल्या मातोश्री या निवासस्थानाबाहेर गेटवर सुरक्षा रक्षक म्हणून काम करणाऱ्या तीन पोलिसांना करोनाची बाधा झाल्याचे समोर आले होते. त्याआधी मातोश्री परिसरातल्या चहावाल्याला करोना झाल्याची माहितीही समोर आली होती. मातोश्रीवर सुरक्षेसाठी तैनात असलेले पोलीस चहा पिण्यासाठी जात होते. त्यामुळे चहा विक्रेत्याला करोनाची बाधा झाल्याचं समोर येताच मातोश्रीवर असलेल्या कर्मचाऱ्यांची करोना चाचणी करण्यात आली होती. काही जणांना चौदा दिवस क्वारंटाइनही करण्यात आले होते. आता तेजस ठाकरे यांच्या ताफ्यातील दोन सुरक्षा रक्षकांना करोनाची बाधा झाल्याची बातमी समोर आली आहे.

महाराष्ट्रात ३ लाखांपेक्षा जास्त करोना रुग्ण आहेत. ज्यापैकी १ लाख ७५ हजार पेक्षा जास्त रुग्णांना आत्तापर्यंत डिस्चार्ज देण्यात आला आहे. तर सध्या राज्यात  १ लाख ३१ हजार ३३४ रुग्ण अॅक्टिव्ह आहेत.