मुंबईत जसे काव काव करणारे कावळे भरपूर आहेत, तसे मुंबई महापालिकेच्या कामकाजावर  बोलणारे बरेच जण आहेत. पण देशभरात सर्वात जास्त स्वच्छ आणि पारदर्शक कारभार मुंबई महापालिकेत आहे असा दावा शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केला आहे.

मुंबई महापालिकेत प्रबोधनकार ठाकरे यांच्या तैलचित्राचे सोमवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत अनावरण झाले. कार्यक्रमाच्या सुरुवातीलाच उद्धव ठाकरे यांनी मुंबई स्वच्छ ठेवण्यासाठी मेहनत करणा-या सफाई कर्मचा-यांचे आभार मानले. यानंतर त्यांनी भाजपचेही आभार मानले. गेल्या पाच वर्षांपासून भाजप आमच्या खांद्याला खांदा लावून उभी राहिला नसता तर मुंबईत एकही काम झाले नसते. मुंबईच्या विकासकार्यात भाजपचाही सिंहाचा वाटा असल्याचे त्यांनी सांगितले. या कार्यक्रमात उद्धव ठाकरे यांनी विरोधकांचा चिमटा काढला. मुंबई महापालिकेतील भ्रष्टाचारावरुन भाजपने शिवसेनेची कोंडी करण्याचा प्रयत्न केला आहे. यावरुन उद्धव ठाकरे यांनी भाजपवर निशाणा साधला.

मुंबई महापालिका आणि ठाकरे कुटुंबीयांचे जवळचे संबंध आहेत असे त्यांनी नमूद केले. महापालिकेत प्रबोधनकार ठाकरे यांचे तैलचित्र लागल्याने आता महापौरावर थेट त्यांचीच नजर असल्याचे त्यांनी सांगितले. मुंबई महापालिकेत शिवसेनेचा महापौर झाल्यावर परत येऊ असे सांगत त्यांनी महापालिका निवडणुकीत शिवसेनेचाच विजय होईल असा विश्वास व्यक्त केला. या कार्यक्रमात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रबोधनकार ठाकरे यांच्या कार्याला उजाळा दिला. प्रबोधनकार ठाकरे यांनी मोठे जनमतही घडवले होते अशी आठवण त्यांनी सांगितली. महात्मा फुलेंना त्रास झाला, त्यावेळी सनातनी लोकांविरोधात बंड पुकारण्याचं काम प्रबोधनकारांनी केलं. जातीयता, अंधश्रद्धा दूर करण्यासाठी प्रबोधनकारांनी संघर्ष केल्याचे त्यांनी आवर्जून सांगितले.