सर्व खात्री करून आपण सरकार स्थापन केले असून त्याबाबत सुरू असलेल्या उलटसुलट चर्चा, माध्यमांमधील बातम्या-समाजमाध्यमांमधील संदेश यांच्यामुळे विचलित होऊ नका. भाजपचे सरकार निश्चितपणे बहुमत सिद्ध करेल, असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भाजप आमदारांच्या बैठकीत दिला. त्यामुळे बैठकीतून बाहेर पडलेले आमदारही थोडे निश्चिंत झाल्याचे दिसत होते.

मुख्यमंत्री म्हणून शनिवारी शपथ घेतल्यानंतर देवेंद्र फडणवीस यांनी रविवारी दुपारी भाजपच्या आमदारांची बैठक बोलावली होती. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, संघटनमंत्री विजय पुराणिक, महाराष्ट्राचे प्रभारी भूपेंद्र यादव आदी यावेळी उपस्थित होते.

शुक्रवारी रात्रीनंतर अचानक घडामोडी कशा सुरू झाल्या त्यापासून ते शनिवारी सकाळी शपथविधी होऊन सरकार स्थापनेपर्यंतचा घटनाक्रम मुख्यमंत्री फडणवीस यांनी उलगडून सांगितला. भाजप व सोबत आलेले अपक्ष आणि अजित पवार यांच्यासोबतचे राष्ट्रवादीचे आमदार यामुळे आपण सहज बहुमत सिद्ध करू, असे फडणवीस यांनी सांगितले. सध्या राजकीय वातावरण तापले असल्याने  उलटसुलट चर्चा सुरू झाल्या आहेत. माध्यमांमधील बातम्या-समाजमाध्यमांमधील संदेश यांच्यामुळे संभ्रम निर्माण होत आहे. पण त्यामुळे विचलित होऊ नका, असा सल्लाही फडणवीस यांनी दिला. प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनीही आमदारांना आश्वस्त करत आपलेच सरकार राहणार अशी ग्वाही दिली.

बैठकीला जाताना अनेक आमदारांच्या चेहऱ्यावर सरकार स्थापनेचा आनंद पण बहुमत कसे सिद्ध होणार असा प्रश्न होता. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि ज्येष्ठ नेत्यांचा आत्मविश्वास आणि बहुमत सिद्ध करण्यासाठी पक्षाने केवळ राष्ट्रवादीच्या मतांवर अवलंबून न राहता इतर पक्षांतून, अपक्षांमधून आमदार आपल्याकडे वळवण्यासाठी रणनीती आखल्याची माहिती मिळाल्यानंतर आमदार थोडे निश्चिंत झाले. पण राजकारणात कधीही काहीही घडत असल्याने आमदारांवरही दक्ष राहण्याची व बहुमतासाठी इतर पक्षांतील आमदारांना भाजपकडे वळवण्यासाठी मदत करण्याची जबाबदारी टाकण्यात आली आहे.

फडणवीस आणि अजित पवारांच्या अभिनंदनाचा ठराव

आमदारांच्या बैठकीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबतच राष्ट्रवादीचे कॉंग्रेसचे नेते व उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अभिनंदनाचा ठराव मांडण्यात आला, अशी माहिती बैठकीनंतर भाजप नेते आशीष शेलार यांनी दिली. विश्वासदर्शक ठराव भाजप जिंकेल अशी रणनीती आखण्यात आली आहे. सरकार आल्याने आमदारांमध्ये, महाराष्ट्रात आत्मविश्वास आला आहे. जनादेशाची हेटाळणी शिवसेनेने केली असा उल्लेख आमदारांनी केल्याचे शेलार यांनी सांगितले.