मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या सुरक्षारक्षकाने एका वृत्तवाहिनीच्या पत्रकाराला मारहाण केल्याची घटना बुधवारी गांधी जयंतीच्या दिवशी घडली आह़े  मंगळवारीही जात पंचायतीच्या लोकांनी अशाच प्रकारे विलास बडे या पत्रकारावर हल्ला केला होता़  त्यामुळे पत्रकारांची सुरक्षेचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला आह़े
बुधवारी मंत्रालयासमोर गांधी जयंती कार्यक्रमावेळी मुख्यमंत्र्याच्या सुरक्षारक्षकांनी पत्रकारांना धक्काबुक्की केली. एका सुरक्षा रक्षकाने खाजगी वृत्तवाहिनीचे पत्रकार रामराजे शिंदे यांना मारहाण केली. या प्रकरणी मरीन ड्राईव्ह पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
वैदू जात पंचायतीतर्फे एका तरुणीला मंगळवारी शिक्षा सुनावली जाणार होती. च्च्खाजगी वृत्तवाहिनीचे पत्रकार विलास बडे यांनी पोलिसांना याबाबत माहिती देऊन ते जोगेश्वरी येथे घटनास्थळी गेले. तेथे जमाव आक्रमक होता. सोबत असलेले दोन पोलीस कर्मचारी अधिक पोलीस कुमक घेण्यासाठी गेले असता जमावाने बडे यांना मारहाण केली. अतिरिक्त पोलीस कुमक आल्यानंतर बडे यांची सुटका झाली. या प्रकरणी एकूण सहा जणांवर मारहाणीचा गुन्हा दाखल करून नंतर त्यांची जामिनावर सुटका केल्याची माहिती एमआयडीसी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुरेश हुजबंद यांनी दिली.