सरकार कोकणात प्रकल्प उभारणार

काजू बोंडापासून इथेनॉल आणि सीएनजीचे उत्पादन करणारे प्रकल्प कोकण आणि कोल्हापूरमध्ये उभारण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. या पथदर्शी प्रकल्पांची आखणी करण्यासाठी पणन संचालकांच्या अध्यक्षतेखाली एक समिती स्थापन करण्यात आली आल्याची माहिती सहकार विभागातील अधिकाऱ्याने दिली.

रत्नागिरी, सिंधुदुर्ग आणि कोल्हापूर जिल्ह्य़ांत काजू बियांवर प्रक्रिया करणारे उद्योगही आहेत. या जिल्ह्य़ात काजू पिकाच्या बाबतीत बी शिवाय काजू बोंडूचे सुमारे २२ लाख मेट्रिक टन उत्पादन होते. मात्र त्यावर प्रक्रिया करणारा कोणताही उद्योग राज्यात नसून गोव्यातील काही मद्यनिर्मिती करणारे कारखाने कवडीमोल किमतीने हे बोंडू घेऊन जातात. काजू बोंडाच्या रसापासून फेणी, वाइन, इथेनॉल, सीएनजी, व्हाइट स्पिरिट आदी उपपदार्थाची निर्मिती करता येते. तसेच या बोंडाच्या चोथ्यापासून फायबर, कोंबडय़ांसाठी खाद्य तसेच पशुखाद्यही निर्माण करणे शक्य असल्याचे संशोधनातून समोर आले आहे.